मासेमारीसाठी कोळी बांधव पुन्हा सज्ज
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड व एकदरा कोळीवाड्यातील कोळी मच्छिमार बांधव होळी उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईवरुन आपल्या बोटीतून गावी येत असतात. होळी उत्सव आनंदाने आटोपून पुन्हा आपल्या उदारनिर्वाहकरिता खोल समुद्रात जाण्यास कोळी बांधव सज्ज झाला आहे.
मुरुड येथील एकदरा पुलाखाली सहा सिलिंडर्सच्या शेकडो बोटींची डागडुजीची कामे पूर्ण करुन कोळी बांधव रंगपंचमीच्या मुहूर्तावर खोल समुद्रात जाण्यास सज्ज झाला असून, होड्यांमध्ये सामान भरण्याची रेलचेल सुरू झाली आहे. मोठ्या बोटींवर खोल समुद्रात मासेमारी करीत असताना दहा-पंधरा दिवस राहावे लागते. यासाठी मिळालेली मासळी ताजी राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ भरण्यात येत आहे. रॉकेल, डिझेल, महिनाभर पुरेल एवढे धान्य, खाद्यपदार्थ व विविध वस्तू बोटींवर भरण्यास सुरुवात केली आहे. विविध संकटांना सामोरे जाणारे मच्छिमार पुन्हा नव्या उमेदीने मासेमारी करण्यासाठी खोल दर्यात जाण्यास सज्ज झाले आहेत. संकटाचा काळ संपून मासेमारी मोठ्या प्रमाणात होऊन झालेला कर्ज फिटो, धंद्यात चांगला फायदा मिळावा, हीच प्रार्थना समस्त कोळी समाज करीत आहेत.