। पोलादपूर । प्रतिनिधी ।
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत गुरूवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. अखेर 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या बाईकस्वार दांपत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेनळी घाटातील एका अतिधोकादायक वळणावर स्प्लेंडर बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेवरून बाईकवरील प्रवासी दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यानंतर तात्काळ प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
रेस्क्यू टीमने दोरांच्या साहाय्याने सुमारे 500 फूट खोल दरीत उतरून अत्यंत धोकादायक परिस्थितीत शोधकार्य सुरू केले. अंधार, निसरडे उतार, दाट धुके आणि सुरू असलेला पाऊस यामुळे ही मोहीम अत्यंत कठीण बनली होती. रात्री सुमारे 1वा 30 मी वाजेपर्यंत सुरू असलेल्या अथक प्रयत्नांनंतर प्रथम पुरुषाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, प्रतिकूल हवामान आणि वाढत्या धोक्यामुळे उर्वरित बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9 वाजता पुन्हा बचावमोहीम सुरू करण्यात आली. नव्या उत्साहाने आणि अधिक नियोजनपूर्वक सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल तीन तासांच्या अथक मेहनतीनंतर महिलेचा मृतदेहही दरीतून बाहेर काढण्यात यश आले. यामुळे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या दुर्घटनेत मृतांची ओळख मोहन चव्हाण (55) आणि जयश्री चव्हाण (48) रा. सोनगिरवाडी अशी झाली आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर व महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
आंबेनळी घाटात 500 फूट दरीत कोसळलेल्या दांपत्याचे मृतदेह सापडले
