| पाली | प्रतिनिधी |
पेडली गावाच्या हद्दीत अंगाई नदीच्या पात्रात एका वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. मृत व्यक्तीची ओळख सखाराम नागु बरतड (75), रा. पोडगाव ता. सुधागड अशी आहे. मृत व्यक्तीचे पुतणे प्रकाश हिरामण बरतड (25), रा. पोडगाव, भपक्याची वाही, ता. सुधागड यांनी याबाबत पाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सखाराम बरतड यांना काही दिवसांपासून कावीळ व अशक्तपणा होता. त्या पार्श्वभूमीवर ते उपचारासाठी आंबोले गावात जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्या व्यक्तीचा मृतदेह अंगाई नदीच्या पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पाली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.





