नो पार्किंग मध्ये पार्किंग
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नो पार्किंग फलक लावण्यात आले आहे. तरीदेखील त्याठिकाणी वाहने पार्किंग केली जातात. त्याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना होत आहे. रुग्ण प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, म्हणून अलिबागध्ये 40 वर्षापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालय बांधण्यात आले. दुमजली बांधलेल्या या इमारतीमध्ये 200 खाटांचे रुग्णालय आहे. महिलांसह पुरूष लहान मुले अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या आजारांवर या रुग्णालयात उपचार केले जातात.
रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण कक्ष असून अस्थिव्यंग, दिव्यांग, डोळे, नाक कान घसा अशा आजारांवरील तज्ञ डॉक्टरांचे कक्ष आहे. या ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी हजारोच्या संख्येने रुग्ण येतात. तसेच दाखल केलेल्या रुग्णांच्या आजारावरही रुग्णालयात उपचार केले जातात. जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातासह वेगवेगळ्या आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रुगालयाच्या आवारात वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात होते. अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याचा त्रास सर्वसामान्यांना कायमच होत आला आहे. रुग्णालयाच्या आवारात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बांधकामामुळे वाहने कुठे पार्किंग करायची असा प्रश्न नागरिकांसमोर कायमच आहे.
रुग्णालयाच्या आवारात पार्किंग व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी रुग्ण प्रशासनाने खासगी सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे.आवारात पार्किंग व नो पार्किंग असे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. मात्र, हे फलक फक्त नावापुरताच असल्याचे समोर आले आहे. नो पार्किंग असतानादेखील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह काही मंडळींकडून त्याठिकाणी बिनधास्तपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. नो पार्किंगच्या फलकांकडे दुर्लक्ष करून वाहने पार्किंग केली जात असताना देखील तेथील सुरक्षा यंत्रणा व प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. सर्वसामान्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला वाहने पार्किंग केल्यास प्रशासनाकडून त्यांना तंबी भरली जाते. मात्र काही मंडळींनी नो पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग केल्यावर मात्र त्यांना मान सन्मान देण्याचा प्रकार रुग्ण प्रशासनाकडून केला जात आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. रुग्ण प्रशासनाच्या या गलथान कारभाराबाबत सर्वसामान्यांकडून नाराजीचे सुर उमटत आहेत.
रुगालयाच्या आवारात खडीचे साम्राज्य
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून मेडीकल कॉलेजच्या प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयापर्यंतचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. ठिकठिकाणी खडी पडली आहे. धुळीचा त्रासदेखील सर्वसामान्यांना होत आहे. त्याच रस्त्यावरून रुग्णांचीदेखील ने - आण होते. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासन उदासीन ठरल्याचे चित्र दिसून आले आहे.







