। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील सुकेळी येथील कालव्यात रविवारी (दि. 2) चिकणी येथील तरुण प्रदीप गणपत देवरे (38) याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. प्रेमळ स्वभावाच्या प्रदीप देवरे यांच्या अकाली मृत्यूने नागोठणे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील सुकेळी खिंडीच्या जवळ असणाऱ्या पुलाखालील कालव्यात एक अज्ञात व्यक्ती पडलेला आहे अशी माहिती नागोठणे पोलीस ठाण्यास उपलब्ध झाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तद्नंतर 90 फूट खोल कालव्यात असलेला मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनेसाठी मृतदेह नागोठणे प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आला. मृताच्या खिशामध्ये सापडलेल्या पॉकेटमधील ओळख पत्रावरून मृतदेहाची तात्काळ ओळख पटली. प्रदीप याने नैराश्यातून पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले असून, याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करीत आहेत.
सुकेळी येथील कालव्यात चिकणी येथील तरुणाचा मृतदेह सापडला
