| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज (दि.१९) दिवसभर जय शिवराय जय जिजाऊ नाद घोषाणे आसमांत दुमदुमला होता. पेण नगरपालिकेडून शासकीय शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आली. यावेळी पेणच्या प्रथम नागरिक प्रितम पाटील यांच्या हस्ते शासकीय पुजन करण्यात आले. त्यानंतर शालेय मुलांचे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षित दाखविण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, मुख्याधिकारी जिवन पाटील यांच्यासह पेण शहराचे सर्व नगरसेवक पेण नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया प्रमाणात हजर होते.
पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ.म.ना.नेने कन्या विदयालयाकडूनदेखील शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराजांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. ही पालखी कन्या विद्यामंदिरा पासुन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत नेण्यात आली होती. या पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेशभूषा देखील साकारली होती. तसेच यावेळी प्रतापगडाच्या रणसंग्रामाचा देखावादेखील साकारण्यात आला होता. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी स्फुर्ती गीतांवर नृत्यांचे आविश्कारदेखील सादर केले. यामध्ये मोठया प्रमाणात विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सामील झाले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सार्वजनिक विद्यामंदिर पेणच्या विद्यार्थ्यांनी पुर्ण शहरामध्ये महाराजांच्या पालखीचे आयोजन केले होते. यामध्ये अश्वरुढ महाराजांचे चलचित्र साकारले होते. या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी सामिल झाले होते. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भगवे फेटे धारण करून या पालखी सोहळयाची शोभा वाढवली होती. तर आज दिवसभरात अनेक शिवप्रेमींनी महाराजांच्या वेगवेगळ्या गडांवरून शिवज्योतीसह महाराजांना मानवंदना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत होते. आज पुर्ण शहरात शिवमय वातावरण पहायला मिळाले. तर ग्रामीण भागामध्येदेखील मोठया प्रमाणात शिवजयंती गावागावात साजरी करण्यात आली.







