उरणमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

। उरण । वार्ताहर ।

उरण परिसरातील यशश्री शिंदे खून प्रकरण ताजे असतानाच, उरण तालुक्यातील जासई गावामध्ये थरारक घटना घडली आहे. जासई गावातील दि.बा. पाटील सभागृहाजवळ असणाऱ्या निर्जन जागी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत आढळून आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शनिवारी (दि.17) सकाळी आठच्या सुमारास जासई गावातील दि.बा. पाटील सभागृहाजवळ एक प्लास्टिकची गोण आढळून आली. या गोणीतून दुर्गंध येत होता. यासंदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या माध्यमातून ही गोण खोलण्यात आली. या गोणीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याचे आढळून आले. संबंधित व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नाही. अज्ञात मृतदेहाचा उरण पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे दिवस-रात्र गावांमध्ये वर्दळ असूनदेखील या प्रकारची घटना झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version