| उरण | वार्ताहर |
पिरकोन सारडे गाव परिसरातील रस्त्यालगत सोमवारी (दि.10) एका अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात महिलेचा खून झाला आहे की आत्महत्या केली आहे, याचा शोध उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम तसेच, गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा घेत आहेत.
ही महिला विवाहित असून तिचे वय 28 ते 35 दरम्यान आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पिरकोण गावातील नागरिकांनी सदर घटनेची माहिती उरण पोलीसांना दिली. सदर महिलेचा मृतदेह पिरकोण-सारडे रस्त्यालगत आढळून आला आहे. महिलेची ओळख पटली नाही. घटनास्थळावरुन अज्ञात महिलेच्या मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खून की आत्महत्या याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले.