चिरनेरमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

। उरण । वार्ताहर ।

सध्या लोकसभा निवडणुकी बरोबर जत्रा, उत्सव, लग्न सोहळ्याची सर्वत्र धामधूम सुरू आहे. त्यातच चिरनेर-दिघाटी या वर्दळीच्या रस्त्यावर गुरुवारी (दि.२५) सकाळी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. यामुळे चिरनेर परिसरात एकच खळबळ माजली असून उरण पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलेला अज्ञात महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी चिरनेर-दिघाटी या वर्दळीच्या रस्त्याच्याकडेला दुर्गंध येत असल्याचे काही नागरीकांच्या निदर्शनास आले. या नागरीकांनी दुर्गंध कुठून येते याची पाहणी केली असता एक महिला मुत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती उरण पोलीसांना तात्काळ देण्यात आली. उरण पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या छिन्नविछिन्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच, पंचनामा करून महिलेचा मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल केला आहे.

अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही. तसेच, या अज्ञात महिलेनी आत्महत्या केली की महिलेचा खून झाला आहे, याचा तपास उरण पोलीस यंत्रणा करत असून संबंधीत महिलेची माहिती कोणाला असल्यास पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी केले आहे .

Exit mobile version