कोलाडच्या रेस्क्यू टीमची शोध मोहीम यशस्वी
। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील चिकणी येथील आदिवासी वाडीतील 35 वर्षीय महिला अलका लहू जाधव हिने बुधवारी (दि. 16) सकाळी 8.30 वाजता अंबा नदीत उडी घेतली होती. या महिलेची शोध मोहीम कोलाड येथील सह्याद्री वन जीव संरक्षण संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून तसेच आपत्कालीन यंत्रणेच्या सहाय्याने सुरू करण्यात आली होती. त्यानुसार तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी (दि. 18) सायंकाळच्या सुमारास या आदिवासी महिलेचा मृतदेह जेएसडब्ल्यू कंपनीच्या परिसरात असलेल्या अंबा नदी खाडी पात्राच्या किनारी भागात सापडला आहे. या महिलेची ओळख पटविण्यात आली आहे. ही महिला सापडल्याने सदरची शोध मोहीम थांबविण्यात येत असल्याचे रेस्क्यू टीमकडून जाहीर करण्यात आले आहे.






