वाळूमाफियांविरोधात महसूल कर्मचार्‍यांची धाडसी कारवाई

वरिष्ठांना जाग कधी येणार?

| पेण | प्रतिनिधी |

सध्या रायगड जिल्ह्यात सक्शन पंपाद्वारे जोरदार वाळू उत्खननाचा अवैध धंदा सुरू आहे. महाडपासून ते उरणपर्यंत वाळूमाफियांनी हैदोस घातला असून, शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत आहेत. मात्र, असे होत असताना महसूल खाते मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा सवाल केला जात आहे.

हे अवैध धंदे करणार्‍यांमध्ये बड्या बापाच्या धेंड्यांचा समावेश आहे. राजरोसपणे धरमतरच्या खाडीपासून पाताळगंगेच्या खाडीपर्यंत अहोरात्र सक्शन पंप सुरू आहेत. मात्र, महसूल खात्याच्या कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना हे दिसत नाही, हेच नवल. सध्या महसूल खात्याच्या कर्मचार्‍यांनी गांधारीची भूमिका घेतली असतानाच पेण प्रांत कार्यालयाच्या जाबाज कर्मचार्‍यांनी धरमतर खाडीत धाडसी कारवाई केलेली आहे.

प्रांत कार्यालयातील मंडळ अधिकारी व लिपीक यांना त्यांच्या खास सूत्रांकडून धरमतरच्या खाडीत रेल्वे पुलालगत वाळू उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळाली. तालुका प्रतिनिधीलाही ही बाब समजली. अधिकारी वर्ग पोहोचल्यानंतर काही वेळात कृषीवलचे तालुका प्रतिनिधीदेखील तेथे पोहोचले. मात्र, महसूल खात्याचे कर्मचारी हे चारच जण होते. वाळूमाफियांकडे माणसे भरपूर होती. परंतु, महसूल खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाळूमाफियांना खबर गेली असल्याने भरलेल्या गाड्या खाली करुन ते गाड्यांसह पसार झाले होते. सक्शन पंप होडीच्या सहाय्याने गायब करण्यात आले होते. मात्र, सक्शनला लावणारे काही पाईप महसूल कर्मचार्‍यांनी जप्त केले.

महसूलचे चार कर्मचारी भल्या पहाटे वाळूमाफियांविरुद्ध कारवाई करु शकतात. मग तालुक्याचे वरिष्ठ अधिकारी असे धाडस का दाखवत नाहीत, अशी चर्चा कर्मचार्‍यांमध्ये आहे. या कर्मचार्‍यांना पोलीस संरक्षण का दिले जात नाही, याचाही विचार करणे गरजेचे आहे. मात्र, कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागायची, ही स्थिती पेण तालुक्याच्या महसूल विभागाची झालेली आहे.

कारवाईदरम्यान, प्रांत कार्यालयातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी मिळालेली वाळू जप्त केली असून, ती प्रांत कार्यालयाच्या आवारात जमा केलेली आहे. त्याचबरोबर सक्शनला वापरले गेलेले पाईपदेखील जप्त केलेले आहेत. घटनास्थळावरील एकूण स्थिती पाहता, तेथे असणार्‍या कोंड्यांमध्ये शेकडो ब्रास वाळूचे रात्रीच्या अंधारात उत्खनन होत असेल. हे उत्खनन खाकी, खादीच्या तसेच महसूलच्या सफेदपोश अधिकार्‍यांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. एकीकडे महसूल खाते वाळू उत्खननावर बंदी घालत आहे. तर, दुसरीकडे त्याच खात्याचे अधिकारी अवैध वाळू उत्खननाला मदत करत आहेत. हा विरोधाभास सर्वसामान्यांना न समजण्यासारखा आहे.

धरमतर पुलाप्रमाणेच, खारपाडा पूल, सावित्री नदी, दासगावची खाडी, आंबेतची खाडी, सानेगावाच्या खाडीच्या हद्दीतील केळवणे, वशेणी पूल या ठिकाणीही सक्शन पंप उघडपणे दिसतात. याठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून हजारो खारफुटीच्या वृक्षांची (कांदळवन) कत्तल करत आहेत. जर वेळेत या अवैध वाळू उत्खननाला खीळ घातली नाही, तर भविष्यात याचा तोटा बळीराजाला झाल्याशिवाय राहणार नाही. तरी या बाबीकडे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

तहसीलदार (स्वप्नालि डोईफोडे) यांना खास सूत्रांकडून माहिती मिळाली होती, ती माहिती आम्हाला मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आम्ही येण्याची खबर अगोदरच लागल्याने वाळूमाफिया पसार झाले.

युवराज वाकसे
प्रभारी मंडळ अधिकारी

तालुक्यात कोठेही सक्शन पंपाद्वारे वाळू उत्खनन करू दिले जाणार नाही. आणि जर कुणी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध ठोस कारवाई केली जाईल. पेण तालुक्यात कोठेही अशा प्रकारच अवैध उत्खनन केलेले खपवून घेतले जाणार नाही. आजच्या कारवाईमध्ये 15 ब्रास वाळू व सक्शन पाईप जप्त केले असून, घटनास्थळावरील वाळूसाठी तयार केलेल्या कोंड्यादेखील उद्ध्वस्त केल्या आहेत.

स्वप्नालि डोईफोडे
तहसीलदार, पेण
Exit mobile version