बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या वाहनाचा भीषण अपघात

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईच्या जुहू येथील मुक्तेश्वर रोड येथे तीन गाड्यांचा अपघात होऊन दोघेजण जखमी झाले आहेत. यामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीचाही समावेश आहे. सोमवारी, (दि.19) रात्री नऊ वाजता हा अपघात झाला. यावेळी अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना विमानतळावरून जुहू येथील त्यांच्या घरी जात होते. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षाला एका भरधाव वेगात येणाऱ्या मर्सिडीज कारने धडक दिली. यामुळे अक्षय कुमारच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाला रिक्षाची जोरदार धडक बसली. या धडकेत रिक्षाचालक आणि रिक्षातील एक प्रवासी जखमी झाले आहेत. जुहू पोलिसांनी मर्सिडीज चालकाविरुद्ध निष्काळजीपणा आणि बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात इनोव्हा कार उलटून दोन टायर्सवर उभी असल्याचं स्पष्ट दिसतंय. तर ऑटो रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. यावेळी अक्षय कुमार त्याच्या ताफ्यातील दुसऱ्या कारमध्ये होता. अपघात झाल्याचं समजताच त्याचे व्यवस्थापक आणि वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना सुरक्षित आहेत.

Exit mobile version