बॉलिवूडचा ‘ट्रॅजेडी किंग’ हरपला

अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन
मुंबई | प्रतिनिधी |
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. दिलीप कुमार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना श्‍वसनाच्या त्रासामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. परंतु, बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने अखेरचा श्‍वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिलीप कुमार यांचा दफनविधी संपन्न झाला आहे. जुहू येथील कब्रस्थानात त्यांना सुपूर्द ए खाक करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राज्य पोलिसांची बटालियन दुपारी 1.30 च्या सुमारास दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचली होती. दिलीप कुमार यांच्या घरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. घरून त्यांचे पार्थिव थेट स्मशानभूमीत नेण्यात आले. दफनविधीवेळी सायरा बानोदेखील उपस्थित होत्या.

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांनी ‘ज्वार भाटा’ (1944), ‘अंदाज’ (1949), ‘आन’ (1952), ‘देवदास’ (1955), ‘आझाद’ (1955), ‘मुगल-ए-आजम’ (1960), ‘गंगा’ जमुना (1961), ‘क्रांती’ (1981), ‘कर्मा’ (1986) आणि ‘सौदागर’ (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते होते. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले होते. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.

Exit mobile version