। कंदहार । वृत्तसंस्था ।
अफगाणिस्तानावर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर हिंसाचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरले. कंदहार प्रांतातील एका मशिदीत मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदहारच्या एका मशिदीत आज सकाळी झालेल्या या बॉम्बस्फोटात 32 जण ठार झाले आहेत तर या स्फोटातील जखमींची संख्या 40 हून अधिक आहे.
तालिबानच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, जुम्याच्या नमाजादरम्यान दक्षिण अफगाणिस्तानातील एका मशिदीत हा स्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये सामान्य नागरिक नमाजासाठी जमले होते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आलेली नाही. मात्र, मशिदीत अल्पसंख्यांक शिया समुदायाशी संबंधित नागरिक येतात. इस्लामिक स्टेट समुहांद्वारे हे नागरिक टार्गेट करण्यात येतात.
गेल्याच आठवड्यात अफगाणिस्तानातील उत्तर प्रांतातील कुंदुजमध्ये एका शिया मशिदीला आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात 100 हून अधिक जण ठार झाले होते. या स्फोटाची जबाबदारी मइसिसफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती.