बिश्नोई टोळीच्या सहा जणांना अटक
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
स्वातंत्र्यदिनी दिल्ली आणि ग्वाल्हेरमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कट राजस्थान पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांसह टोळीच्या सहा सदस्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील चर्चित बाबा सिद्दीकी खून प्रकरणाचा मास्टरमाईंड, कॅनडात राहणारा जीशान अख्तर याच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता.
राजस्थान पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने ही मोठी कारवाई केली. अटक करण्यात आलेले हे गुन्हेगार 7 जुलै रोजी पंजाबच्या शहीद भगतसिंग नगरमध्ये ग्रेनेड हल्ला करून फरार झाले होते. पंजाबमधील ही घटना घडवून आणल्यानंतर हे सर्व राजस्थानमधील जयपूर आणि टोंक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. पोलिसांनी त्यांना अटक करून पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी दिल्ली आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये बॉम्बस्फोट करण्याची या गुन्हेगारांची योजना होती. जर राजस्थान पोलिसांनी वेळेवर त्यांना अटक केली नसती, तर स्वातंत्र्यदिना दिवशी मोठा घातपात होऊ शकला असता. या टोळीला कॅनडातून जीशान अख्तर चालवत होता. याच जीशान अख्तरने मुंबईतील बाबा सिद्दीकी खून प्रकरणाची जबाबदारी घेतली होती. जीशान अख्तर सोशल मीडियाच्या माध्यमातून या गुन्हेगारांशी संपर्कात होता आणि त्यांना सूचना देत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, कॅनडात राहणाऱ्या जीशान अख्तरने पाकिस्तानी गुन्हेगार शहजाद भट्टी आणि मनू अगवान यांच्याशीही हातमिळवणी केली आहे. हे गुन्हेगार पंजाबच्या गोपी नवा शहरियाच्या टोळीसोबत मिळून, देशातील बेरोजगार तरुणांना पैशाचे आमिष दाखवून गुन्हेगारी कारवायांसाठी वापरत होते. अटक करण्यात आलेल्या सहापैकी तीन आरोपी सज्ञान आहेत, तर तीन अल्पवयीन आहेत. सज्ञान आरोपींमध्ये सोनू उर्फ काली (कपूरथला, पंजाब), जितेंद्र चौधरी (टोंक, राजस्थान) आणि संजय (हनुमानगढ, राजस्थान) यांचा समावेश आहे. अल्पवयीन आरोपींची ओळख कायद्यानुसार जाहीर करण्यात आलेली नाही. राजस्थान पोलिसांनी स्वातंत्र्यदिनापूर्वी हा कट उधळून लावल्याने याला एक मोठे यश मानले जात आहे.







