‘ऋणानुबंध’ शरद पवार आणि रायगडचे

अलिबाग | अतुल गुळवणी |
9270925201

ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तसेच ते रायगडशी आहेत .पवारांच्या राजकीय कारकिर्दीला आता साठ वर्षे पूर्ण झालेली आहेत.या सहा दशकांच्या कालखंडात पवारांनी प्रत्येक जिल्ह्यात आपली राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राशी संबंधित पाळेमुळे घट्ट निर्माण करुन ठेवली आहेत. त्यामुळे पवारांच्याविषयी रायगडवासियांना नेहमीच आदर वाटत आलेला आहे. रविवारी (12 डिसेंबर) त्यांचा वाढदिवस.त्यानिमित्त रायगडच्या मातीशी त्यांच्या जुळलेल्या ऋणानुबंधांचा हा उलगडलेला धागा…

रायगडात पवारांची पाळेमुळे घट्ट झाली ती शेकापमुळेच. ज्येष्ठ नेते अ‍ॅड.दत्ता पाटील, स्व.प्रभाकर पाटील यांच्याशी त्यांचे स्नेहाचे, कौटुंबिक संबध होते.विशेष करुन प्रभाकर पाटील आणि शरद पवार यांचे कबड्डी खेळामुळे ऋणानुबंध वाढले ते आजही कायम आहेत. महाराष्ट्रातील कबड्डीला जागतिक स्तरावर पोहोचविण्यात आणि लोकाश्रयाबरोबरच राजाश्रय मिळवून देण्यात ज्या मंडळींचा मोठा हातभार आहे त्यात शरद पवार, बुवा साळवी, प्रभाकर पाटील आदींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. रायगड जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्षपद प्रभाकर पाटील यांच्याकडे असताना त्यांनी रायगडात कबड्डीला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.त्यावेळी राज्य कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांकडे होती. पवार हे सुद्धा क्रीडा प्रेमी असल्याने त्यांनी रायगडातील कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य कबड्डी महासंघाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले.त्यामुळे पवारांचे पाटील कुटुंबियांशी स्नेहाचे संबंध निर्माण झाले.
राजकीय आखाड्यात देखील पवारांचे दत्ता पाटील यांच्याशी मैत्रीचे संबंध होते.त्यामुळे विधीमंडळात दत्ता पाटील हे प्रभावी विरोधक म्हणून शरद पवारांसारख्या प्रभावी राज्यकर्त्यांना देखील जेरीस आणत असतं.हा इतिहास समस्त रायगडवासियांना चांगलाच ज्ञात आहे.राजकीय मतभेद कितीही असले तरी पवार आणि पाटील कुटुंबियांच्या कौटुंबिक नात्यात कधीही दुरावा आला नाही.उलट दिवंसेदिवस तो वाढतच राहिला.आजही तो अखंडित आहे.अर्थात राजकारणाच्या पलिकडे जाऊन मैत्रीचे संबंध जोपासण्याची परंपरा पवार आणि पाटील कुटुंबियांनी नेहमीच जोपासली आहे.

शेकापची मागणी मान्य
राज्याच्या राजकारणात शेकाप नेहमीच आक्रमक राहिलेला आहे.जनतेच्या प्रश्‍नांसाठी राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याचे प्रसंगही रायगडात अनेकदा आलेले आहे.मग ते सिडको विरोधातील आंदोलन असो वा,महामुंबई सेझ विरोधात केलेले आंदोलन असो.सिडको आंदोलनाच्यावेळी शरद पवारच राज्याचे मुख्यमंत्री होते.त्यावेळी सिडको प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड दिला जावा ही शेकापने केलेली मागणी तत्कालीन पवार सरकारला मान्य करावी लागली.आज त्याचा फायदा पनवेल,उरण परिसरातील लाखो प्रकल्पग्रस्तांना झाला आहे.याचे सारे श्रेय शेकापला जाते हे पवारांनी अनेकदा आवर्जून नमूद केलेले आहे.

काँग्रेस सोडून शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली.त्यांच्या या प्रतिसादेला राज्यात रायगडमधून पहिला प्रतिसाद मिळाला.ज्येष्ठ नेते,माजी मंत्री स्व.दत्ता खानविलकर यांनी पवारांच्या भूमिकेचे स्वागत केले. त्यापाठोपाठ महाडचे माणिकराव जगताप,पालीचे वसंतराव ओसवाल,पेणचे आप्पा धारकर आदींची प्रतिसाद देत रायगडात राष्ट्रवादीची स्थापना केली.आज राष्ट्रवादीच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे भाऊ खानविलकर, प्रभाकर धारकर,माणिकराव जगताप ही मंडळी हयात नाहीत. वसंतराव ओसवाल वार्धक्याने सक्रिय राजकारणातून अलिप्त झालेले आहे.ज्यांच्याकडे सध्या राष्ट्रवादीची धुरा आहे ते सुनील तटकरे हे तब्बल दोन महिन्यानंतर राष्ट्रवादीत दाखल झाले होते.त्यानंतर तटकरे यांनी धूर्तपणे आपल्या मार्गातील अडसर ठ़रु शकणार्‍या मंडळींना खड्यासारखे बाजूला केले आणि रायगडची राष्ट्रवादी तटकरेवादी करुन टाकली हे बोचरे सत्य कुणीही नाकारु शकत नाही.
नैसर्गिक आपत्ती आणि रायगडचे एक अतुट असं नातं आहे.दरवर्षी रायगडात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो.त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीही रायगडावर कोसळते.आतापर्यंत ज्या ज्यावेळी रायगडावर आपत्तींचे डोंगर कोसळले त्यावेळी शरद पवार हे मदतीसाठी धावून आले हे रायगडवासिय कधीही विसरणार नाही.सन 1989 मध्ये आलेल्या महापुरात सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा परिसर वाहून गेला.त्यावेळी शरद पवारच मुख्यमंत्रीपदावर होते.दुर्घटना घडल्यानंतर पवार हे सर्व शासकीय लवाजमा घेऊनच जांभूळपाडा परिसरात ठाण मांडून होते.सन 2005 मध्ये महाड परिसरात झालेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेच्यावेळीही पवारांनी संपूर्ण कोकणाचा दौरा करुन आपदग्रस्तांना दिलासा देण्याचे काम केले होते.अगदी वर्षभरापूर्वी रायगडात आलेल्या निसर्ग आपत्तीच्यावेळीही पवारांनी श्रीवर्धनचा दौरा करुन वादळग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरविण्यासाठी मदत केली होती.याचे स्मरण समस्त रायगडवासियांना आहे.
राजकारणाशिवाय पवारांनी रायगडातील अनेक कुटुंबांशी स्नेहाचे संबंध जोपासले.मग त्या कुटुंबाताली सुखदु:खात ते नेहमीच सहभागी होताना दिसून आले.अगदी प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांच्या निधनानंतर पाटील परिवारांचे सांत्वन करण्यासाठी पवार आवर्जून येऊन गेले.अगदी मागील तीन,चार वर्षापर्यंत शरद पवार हे आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मांडवा परिसरात कुुटुंबियांसह येत असतं.या सार्‍यामुळे पवारांचे रायगडशी असलेले संबंध नेहमीच वृद्धींगत होत राहिले.लोकसभा असो वा विधानसभा या प्रत्येक निवडणुकीत पवारांचा रायगड दौरा हा ठरलेलाच असतो. महाड, माणगाव, रोहा,अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल आदी महत्वाच्या ठिकाणी पवारांच्या जाहीर सभा होतच असतं. जाहीर सभामधून पवारा कुणावर टाकी करतात याबाबतही रायगडात कमालीची उत्सुकता लागून रहायची. रोह्यात आयोजित करण्यात आलेल्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनासाठी शरद पवारच मुख्य अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होते. राजकारणाच्यावेळी राजकारण, अन्यवेळी समाजकारण हा खाक्या त्यांनी नेहमीच जोपासला .त्यामुळे रायगडातही पवारांचे सर्वस्तरात मित्रपरिवार वाढत राहिला.आज त्यातील अनेक सहकारी मित्र जग सोडून गेलेले आहेत.पण पवार मात्र नेहमीच मित्रत्वाला जागत राहिले.माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी पवारांचे राजकीय हाडवैर.पण उभयतांनी कधीही मैत्रीत राजकीय मतभेद उमटू दिले नाहीत.उलट अंतुले यांच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ पवारांच्या हस्तेच होत असे.अशा अनेक घटना पवारांशी निगडीत आहेत.आजही एखादी राजकीय उलथापालथ घडली तर राजकारणातील चाणाक्ष मंडळी त्या घटनेचा पवारांच्या बारामतीशी थेट संबंध जोडून ही सारी पवारांची करणी..असं विनोदाने बोलून दाखवित.अशा अनेक घटना पवारांशी निगडीत आहेत.ज्या ज्यावेळी पवारांचा दौरा होत असे त्याची दखल राजकीय पक्ष आवर्जून घेत आलेले आहेत.कारण त्याचे पडसाद तातडीने रायगडच्या राजकारण उमटत असतं.याचा अनुभव अनेकदा रायगडवासियांना आलेला आहे.
आज रायगडमधून जी कोकण रेल्वे धावतेय त्या कोकण रेल्वेला गती देण्यातही पवारांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांचे रायगडच्या मातीशी विविध कारणांनी राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,व्यक्तिगत ऋणानुबंध आहेत ते आणखी वृद्धींगत व्हावेत, ही मनोकामना.

Exit mobile version