| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मनोहर केशव रणदिवे ग्रंथालय, मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाच्या निमित्ताने दि. 2 ते 3 जानेवारी असे दोन दिवस ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस संस्थेचे सचिव मंगेश देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे ग्रंथपाल मनोज वाढवळ, सहाय्यक मंगेश पोळेकर व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनात व्यक्तिमत्त्व विकास प्रेरणादायी ग्रंथ, चरित्र ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, कथा, कविता, कादंबरी, नाटक, साहित्य, मराठी विश्वकोश, वर्ल्ड बुक इनसायक्लोपीडिया, विविध पुरस्कारप्राप्त ग्रंथ व विविध विषयांवरील ग्रंथांचा समावेश करण्यात आला होता. वाचनविषयक आवड निर्माण करणारे विविध उपक्रम संस्थेमध्ये सतत राबवले जातात व त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये एका दिवसामध्ये 125 ते 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, चौथीपासून ते पदवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच ग्रंथालयाचे वाचक वाढण्याच्यादृष्टीने ग्रंथालयामध्ये सेल्फी बुकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पुस्तकासोबत सेल्फी फोटो घेऊन ग्रंथ प्रदर्शनाचा आनंद लुटला. सदर ग्रंथ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल यांनी परिश्रम घेतले.