| तळा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या आदेशानुसार 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत असून, त्या अनुषंगाने श्री गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठानचे जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा येथे ग्रंथालय विभागामार्फत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, मराठी भाषा संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असून ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच वाचन संस्कृती आत्मसात करावी, असे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल धवन एस. के. यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, हा या ग्रंथ प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. विविध विषयांवरील पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल धवन एस. के. यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल निकम यांनी मानले.
तळा येथे ग्रंथ प्रदर्शन
