। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ज्येष्ठ नागरिक, फ्रंट लाईन वर्कर, हेल्थ वर्कर यांच्यासाठी तिसर्या बूस्टर डोसचे लसीकरण सोमवार (दि.10) पासून सुरू करण्यात आले आहे. मात्र अलिबागमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात हयगय झाल्याने सकाळपासून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीन तास ताटकळत रहावे लागले.
अलिबाग शहरातील सावित्री पर्ल इमारतीत फ्लॅटमध्ये स्वच्छता केल्यानंतर साडे अकरा वाजता लसीकरण सुरू करण्यात आले.रायगड जिल्ह्यातही आजपासून ज्येष्ठ नागरिक, फ्रंट लाईन वर्कर, हेल्थ वर्कर याचे लसीकरण सुरू झाले आहे. अलिबागमधील डोंगरे हॉल येथे ज्यांना तिसर्या डोससाठी मेसेज आले होते, असे ज्येष्ठ नागरिक नऊ वाजल्यापासून तिसरा बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर दाखल झाले होते.मात्र, डोंगरे हॉल येथे याबाबत कोणतीच माहिती कर्मचार्यांना नसल्याने गोंधळ उडाला होता.
अखेर शहरातील ब्राम्हण आळी येथील सावित्री पर्ल इमारतीत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक हे त्याठिकाणी दाखल झाले. मात्र लसीकरण केंद्राची स्वच्छता होईपर्यत या जेष्ठ नागरिकांना काही काळ वाट पाहावी लागली. त्यानंतर जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरळीत सुरू झाले.जिल्ह्यात आज 1 हजार 147 ज्येष्ठ नागरिक, 6 हजार 153 फ्रंट लाईन तर 7 हजार 353 हेल्थ वर्कर यांचे लसीकरण होणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी बूस्टर डोस लसीकरण मोहिमेत प्रशासनाचा सावळा गोंधळ झालेला पाहायला मिळाला.