बोर्लीकरांची तहान वाढली; वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी प्रश्‍न गंभीर

नूतन जलजीवन पाणी योजनेची प्रतीक्षाच उरली

| दिघी | गणेश प्रभाळे |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन हे अनेक शहरांच्या तुलनेत मोठी लोकवस्ती तसेच प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे आवाका वाढत असल्याने येथे पाण्याची समस्या कायम आहे. सद्यस्थितीत होत असलेला पाणी पुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने मुबलक पाणी पुरवठ्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बोर्लीपंचतन येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुरुवातीला कोंढेपंचतन येथे धरण बांधण्यात आले. मात्र, या धरणातील पाणी पुरवठा पावसाळी होत असून, नागरिकांना पाण्याची आवश्यकता असताना या धरणात पाणीच नसते. त्यामुळे धरण उशाला अन कोरड घशाला ही परिस्थिती बोर्लीकरांवर आली. दुसर्‍या योजनेत कार्ले येथील धरणातील पाण्यासाठी विहिर व पाईपलाईन जोडण्यात आली आणि बोर्लीपंचतन शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, वाढत्या लोकसंख्येने शहराची तहान वाढू लागली. यासाठी पुढे आणखी एक पाणी योजना राबविण्यात आली. सध्या शहराला याच दोन योजनेतून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, एवढया योजना मार्गी लागल्या तरी दिवसांआड आणि एकदीड तास होणारा पाणीपुरवठा कितपत शहराची तहान भागवणार याबद्दलही शंका व्यक्त होत आहे.

बोर्लीपंचतन शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने या ठिकाणी इमारतीचे जाळे निर्माण झाले आहे. दिवेआगर पर्यटन स्थळ तसेच तूरंबाडी व दिघी पोर्ट सारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे ग्रामीण भागातून शहरीभागाकडे येणार्‍यांचे प्रमाणही वाढते आहे. एकूणच शहराचे राहणीमान उंचावले असून वस्तीही वाढत आहे. साहजिकच पाण्याची गरज वाढून त्याचा तुटवडा सध्या भासत आहे. बोर्लीकरांच्या स्वतःच्या मालकीचे तीन योजना असूनही शहरावर टंचाईचे सावट असते.

पाण्यासाठी वाढता आवाका
1996 साला पासून 2013 या कालावधीत तीन पाणी योजना राबविण्यात आल्या. त्या दरम्यान 6800 लोकसंख्या होती. सध्या बोर्लीपंचतन शहराची लोकसंख्या अंदाजे 10 हजाराहून जास्त आहे. त्यामुळे पाण्याच्या समस्या वाढत आहे. ती सोडविण्यासाठी ठोस उपाययोजनेची गरज आहे. तात्पुरत्या उपाययोजनाने पाणी टंचाई दूर होणार नाही. ती कायमची सुटण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

पाण्यासाठी धावाधाव
दिवसाआड संपूर्ण शहरासाठी पाणीपुरवठा होत आहे. या एक – दीडतास मिळणार्‍या पाण्यासाठी अनेक कामे टाकून पिण्याचे पाणी भरण्यासाठी धावपळ उडत आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत बोर्लीपंचतन शहरासाठी साडे चार कोटी निधीच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी ग्रामपंचायततर्फे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसात ग्रामसभा देखील घेण्यात येणार आहे.

ज्योती परकर, सरपंच
Exit mobile version