अजून दहा महिने काम रेंगाळण्याची शक्यता
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 व सध्याचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही भुयारी मार्ग 30 महिन्यांमध्ये पूर्ण करून त्यानंतर देखभाल दुरूस्ती करण्याचा करार असताना तब्बल 40 महिने होऊनही दोन्ही भुयारी मार्ग अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने भरलेल्या निविदेची तुलनात्मक किंमत वाढून या कामावरील खर्चदेखील वाढणार असल्याने याचा लाभ पोटठेकेदार कंपनीला मिळणार किंवा मूळ रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळणार याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने हे काम वाजवीपेक्षा अधिक काळ म्हणजे अजून दहा महिने तरी रेंगाळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
कशेडी घाटामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पध्दतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घाटातील प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा मंजूर झाल्याने स्वीकारले असून, 441 कोटी रुपयांचा खर्च याकामी होणे अपेक्षित आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील खवटी येथून 2019च्या पावसाळयापूर्वीच भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. सह्याद्री पर्वतराजींचा कातळ फोडून कोकण रेल्वेचा करबुडे लोहमार्ग ज्याप्रमाणे बोगद्यातून नेण्यात आला; त्याप्रमाणेच खेड आणि पोलादपूर यादरम्यान हे दोन भुयारीमार्ग निर्माण करण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत एनएडीपी 4 मंत्रालयाच्या अंतर्गत आयोगाने हा प्रकल्प 30 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे सूचित केले आहे. 31 ऑॅक्टोबर 2017 पर्यंत टेंडर भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे टेंडर प्रक्रिया 2018च्या सुरुवातीलाच पूर्ण झाली होती.
कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेच बुमर वापरण्यात आले असून, याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात होते. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पध्दतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग झाला आहे. भुयारी मार्गामध्ये महत्वाच्या ठिकाणी सुरुंग स्फोटासाठी जिलेटिनचा वापर केला जात असून, भुयारामध्ये पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर केला जात आहे. हे कातळाचे दगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये वापरण्यात आले.
अभियांत्रिकी प्रॉक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन यांच्यासोबत 441 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे कशेडी घाटातील प्रस्तावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविताना तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. यातील करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित असून या रस्त्याचे कामदेखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच करीत आहे. या कंपनीने शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या पोटठेकेदारांमार्फत हे काम पूर्ण करण्याचा करार केला असून या पोटठेकेदार कंपनीकडून भुयाराच्या आणि भुयारापर्यंत जाणार्या रस्ते व पुलांच्या कामात प्रचंड दिरंगाई होऊन विलंब झाला असल्याने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने भरलेल्या निविदेची तुलनात्मक किंमत वाढून या कामावरील खर्चदेखील वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक मुद्दयांमुळे हे काम अजून काही काळ रेंगाळणार असल्याचे संकेत एसडीपीएल कंपनीच्या कामाच्या गतीवरून मिळत आहेत. 2019 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेले हे काम एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी दिली होती. मात्र, आता हे काम 2024च्या प्रारंभी लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात असून तशी चिन्हेही दिसून येत आहेत.