विधिमंडळात पुन्हा सीमाप्रश्‍न

विरोधक आक्रमक, जोरदार खडाजंगी

| नागपूर | प्रतिनिधी |

विधिमंडळाच्या दुसर्‍या आठवड्याचा प्रारंभ सोमवारी सीमा प्रश्‍नाच्या मुद्यावरुन जोरात झाला. सरकारने सीमाप्रश्‍नी ठराव मांडावा, असा जोरदार आग्रह विरोधी पक्षांनी धरला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमावादावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर ठाकरी आसूड ओढले. तसेच जोपर्यंत सीमावादाचा प्रश्‍न निकाली निघत नाही तोपर्यंत हा सगळा सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अधिवेशनात बोलण्यासाठी विधान परिषदेच्या सभागृहात बोलायला उभे राहिले. चर्चेत भाग घेताना उद्धव ठाकरे हे कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून आले. सीमाप्रश्‍न महत्त्वाचा असल्याने विरोधक आणि सत्ताधारी यांचं एकमत आहे, याचं बरं वाटलं. सीमावादाचा लढा हा माणुसकीचा आहे, असं सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बेळगावचा उल्लेख कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असा केला. आजही सीमाभागातील लोकांची मातृभाषा मराठी आहे. त्यांनी मराठी जपली आहे, वाढविली आहे. असं सांगतानाच त्यांना जपण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांच्यासाठी आवाज उठविण्याची वेळ आलेली असताना मुख्यमंत्र्यांना आज दिल्लीत जाण्याची गरज नव्हती. दिल्लीत आज मुख्यमंत्री सीमावादाचा प्रश्‍न मांडणार का? असा सवाल उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांपासून सीमावादावर राज्य सरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीका विरोधक करत आहेत. उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणात हाच सूर पकडून 18 मिनिटांच्या भाषणात शिंदे-फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार आसूड ओढले. सरतेशेवटी सीमाभागाचा लढा हा राजकीय नाही माणुसकीचा आहे, सांगतानाच विरोधक-सत्ताधार्‍यांनी याप्रश्‍नी एकत्र येण्याची गरज असल्याचं देखील ठाकरे म्हणाले.

उद्या ठराव आणणार
सीमाप्रश्‍नांबाबत मंगळवारी विधिमंडळात ठराव आणण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली येथे केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी वीर बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्राच्या निमंत्रणावरुन दिल्लीला आलो होतो. सीमा वाद हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत कायदा व सुवस्थेचा प्रश्‍न होऊ नये, याच्या सूचना केल्या आहेत. हा विषय 60 वर्षांपासूनचा आहे. असं असताना प्रकरणावर परिणाम होऊ नये याची काळजी घ्यायला हव्या. जे आज बोलत आहेत त्यांनी सीमाभागातील लोकांच्या योजना बंद केल्या. टीका करणार्‍यांनी माहिती घेऊन बोलावं. आम्ही पूर्णपणे सीमावासियांसाठी खंबीर आहोत, असंही ते म्हणाले.

सत्ताधार्‍यांमध्ये धमक आहे का?
सीमावादावर कर्नाटकचे मंत्री नेते एकजुटीने भूमिका मांडतात. पण आपले नेत्यांमध्ये एकजूट दिसत नाही. याउलट आपले नेते कर्नाटकात जाऊन जन्म घ्यावा तर कर्नाटकच्या मातीत. असं वक्तव्य करतात. असले जर राज्यकर्ते असतील तर काय बोलायचं..? अशा शब्दात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र एकीकरण समितीचा संयम सुटत चालला आहे. त्यांना आधाराची गरज आहे. अशावेळी सत्ताधार्‍यांनी ठामपणे भूमिका घ्यायची गरज आहे. जर कर्नाटकचे मुख्यमंत्री इंचभरही जमीन देणार नाही, अशी दर्पोक्ती करतात तर कर्नाटक एवढी धमक आपल्या सत्ताधार्‍यांमध्ये आहे का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

सीमाभागात दररोज मराठी भाषिकांवर अत्याचार होतायेत. तिथलं सरकार त्यांच्यावर अन्याय करतंय. त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करतंय. तिथले लोक त्रस्त आहेत. मी मागे कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळी आम्हाला कानडी शिकायची नाही. आम्हाला आमची मायमराठी प्रिय आहे. आम्हाला मराठीचे धडे द्या. आमच्या पोरांना मराठीत शिकू द्या, अशी मागणी तिथल्या लोकांनी माझ्याकडे केली, असं सांगतानाच आता सीमाभागातल्या लोकांसाठी सत्ताधारी-विरोधक असं न पाहता एकजुटीने हा प्रश्‍न निकाली काढण्याची आवश्यकता असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

सीमाभागाचा लढा हा राजकीय नाही. सीमावादावर मी एक पेन ड्राईव्ह देणार आहे. 1970 च्या दशकात एक फिल्म सीमा भागातील नागरिकांवर केली होती. अठराव्या शतकात त्याठिकाणी मराठी कशी वापरली जात होती. त्याचा उल्लेख आहे. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवा, विरोधी पक्षातल्याच लोकांकडे पेनड्राईव्ह असायचा.

उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही, जसं कर्नाटक म्हणतंय, तसंच आपणही इंच इंच लढू. सर्वोच्च न्यायालया असेल किंवा केंद्र सरकार असेल, सीमाभागातील मराठी भाषकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते करू.

देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री


सीमावादाच्या प्रश्‍नावर सरकार विधिमंडळात ठराव आणणार होते. अद्याप ठराव का आणला नाही? असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कर्नाटकने ठराव आणला आणि कारण नसताना सीमावाद चिघळला, अशी टीका अजित पवार यांनी केली. परिस्थिती चिघळवायचा प्रयत्न करू नका, असा गंभीर इशारा महाराष्ट्राने दिला पाहिजे, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या विषयावर सभागृह एक आहे. आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचं नाही, आपल्याला एक राहायचं आहे, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या गदारोळावर स्पष्ट केलं.

कर्नाटकविरोधात आपलं ठराव आणण्याचं ठरलं होतं. मागच्या आठवड्यातलं वातावरण जरा गंभीर होतं. त्यामुळे तो आणता आला नाही. आज तो आणण्याचा निर्णय होता. पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रण आलं आणि महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना दिल्लीला जावं लागलं. मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला गेलेत, ते दुपारी परतणार आहेत. मुख्यमंत्री आज दुपारपर्यंत येतील. शक्य झाल्यास आज नाहीतर उद्या आपण हा ठराव निश्‍चितपणे मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version