| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील थाई बॉक्सिंग खेळाडू असलेली वैदेही जाधव हिने आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिच्या या कामगिरीबद्दल राष्ट्रीय थाई बॉक्सिंग फेडरेशनकडून सत्कार करण्यात आला.
बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत वैदेही जाधव हिने भारताला रौप्यपदक जिंकून दिल्याबद्दल तमाम महाराष्ट्रातून तिचे कौतुक केले जात आहे. देशामध्ये परतल्यावर राष्ट्रीय थाई बॉक्सिंग फेडरेशनकडून वैदेहीचा सन्मान करण्यात आला आहे. वैदेही जाधवच्या यशस्वी कामगिरीला वाव देण्यासाठी इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष पाशा अत्तार यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा कमिटीच्या अध्यक्षा अरुणा हिवरकर, मुंबई विभाग अध्यक्ष हरी ओम, उपाध्यक्ष अजय सरोदे, रायगड जिल्हा अध्यक्ष स्वप्निल अडूरकर, महाराष्ट्र पोलीस मोहिनी अडूरकर, सौरभ गुरव आणि पालक विजय जाधव आदी उपस्थित होते.







