। अलिबाग । प्रतिनिधी ।
रात्रीचा दिवस करून सेवा देणारे एसटी कर्मचारी तुटपुंज्या वेतनामध्ये काम करीत आहेत. त्यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबत फक्त आश्वासने देण्यात आली असल्याचे एसटी कर्मचार्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह येत्या सात मे रोजी होणार्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक आगारांसह स्थानकात बहिष्काराचे फलक लावण्यात आल्याचे दिसून आले आहे.
एसटी महामंडळ रायगड विभागात तीन हजारांहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. त्यामध्ये दीड हजारांहून अधिक चालक व वाहकांची संख्या आहे. आपत्कालीन परिस्थितीत एसटी कर्मचार्यांनी प्रवाशांना सेवा दिली आहे. निवडणुकीच्या काळात कर्मचार्यांसह मतपेट्यांची ने-आण करणे, कोरोना काळात परराज्यातील कर्मचार्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचविण्याचे कामदेखील कर्मचार्यांनी केले आहे. त्यामध्ये चालक व वाहकांचे योगदान मोलाचे राहिले आहे. मात्र, एसटी कर्मचारी शासनाच्या सुविधांपासून वंचित राहिल्याचे बोलले जात आहे.
वेतनवाढीसह सातवा वेतन आयोग मिळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचारी सरकारकडे चपला झिजवत आहेत. मात्र, सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात आली. त्यामुळे एसटी कर्मचार्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील होणार्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 7 मे रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. या दिवशी एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मतदान करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मतदानावर बहिष्कार टाकण्याचे फलक स्थानकात लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणेला आवाहन केले आहे. मात्र, कर्मचार्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यास मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वेतनवाढीबरोबरच सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी कर्मचारी मागणी करीत आहेत. मात्र, अजूनपर्यंत त्याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचार्यांसह कुटुंबिय मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे फलक स्थानकात लावले आहेत.
दिलीप पालवणकर,
एसटी कर्मचारी