अलिबागमधील कनकेश्वर येथील मंदिराजवळील घटना
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
डोक्यावर, कपाळावर लोखंडी हातोड्याचे घाव करून प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न प्रियकराने केला. ही घटना शुक्रवारी (दि.10) सायंकाळी अलिबाग जवळील कनकेश्वर येथील मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी प्रियकराविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयाच्या कारणावरून त्याने तिला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज बुरांडे असे या आरोपीचे नाव आहे. हा अलिबाग तालुक्यातील थेरोंडामधील वरसोलपाडा येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रियकर आणि प्रेयसी असे दोघेजण कनकेश्वर येथील मंदिराच्या पायऱ्यांजवळ असणाऱ्या वडाच्या झाडाजवळ होते. ती दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय त्याच्यामध्ये निर्माण झाला होता. त्याने बॅगेतून लोखंडी हाताडो काढला. त्या हातोड्याने तिच्या डोक्यावर व कपाळावर घाव घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तारेच्या जाळीत ओढत नेऊन तिला दगडाने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ती गंभीर जखमी झाली असताना त्याने तिला त्याच ठिकाणी तीन तास बसवून ठेवले.







