महावितरणच्या गलथान कारभाराचा चार महिन्यातील चौथा बळी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील अंजप गावातील एका तरुणाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाच वाजण्याच्या सुमारास येथील 38 वर्षीय तरुण एका झाडावरील पाने तोडत असताना त्या झाडीमधून गेलेली वीज वाहिनीचा धक्का लागून अर्जुन मोरेश्वर मिणमीने यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान महावितरण कंपनीच्या चुकीच्या पद्धतीने वीज वाहिनी जोडण्याच्या कामामुळे मागील चार महिन्यात चार जणांचे बळी गेले असून, देखील महावितरण विभाग आपला कारभार सुधारत नसल्याने महावितरण विरुद्ध जनतेचा रोष वाढला आहे.
कर्जत तालुक्यातील कळंबोली उप केंद्राजवळ असलेल्या अंजप गावातील तरुण अर्जुन मिणमीने हे सायंकाळी गावाबाहेर झाडाची पाने आणण्यासाठी रस्त्याने पेज नदीकडे गेले होते. त्यावेळी कोरवले प्रकारच्या झाडाची पाने काढत असताना अचानक त्यांच्या हाताला विजेच्या वाहिनीचा धक्का बसला. त्या ठिकाणी मोठ्या दाबाचा वीज प्रवाह हा जात असून, ती वीज वाहिनी काही फूट अंतरावर झाडी मधून गेली होती. त्यामुळे त्या झाडाच्या आत मधून वीज वाहिनी गेली असल्याची कोणतीही माहिती अर्जुन मिणमीने यांना नव्हती. त्यामुळे विजेचा धक्का बसून अर्जुन मिणमीने तेथेच तडफडून पडले. हा प्रकार गावातील स्थानिक ग्रामस्थांना माहिती होई पर्यंत अर्जुन यांचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला होता.
या प्रकाराची माहिती अंजप गावासोबत आजुबाजूच्या ग्रामस्थांना समजल्यावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ अंजप गावाच्या भागात जमले. अंजप गावातील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येत नाही तोवर अर्जुन मिणमीने यांचा मृतदेह उचलून देण्यास विरोध करीत आहे. त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त करीत आहेत. तर महावितरण कंपनीचं उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांच्या कडून स्थानिकांचे तसेच पोलिसांचे फोन रिसिव्ह केले जात नसल्याने अंजप गावात आणखी तणाव वाढला आहे.
महावितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे कळंबोली उप केंद्राच्या पलीकडे असलेल्या गावातील आठ वर्षीय शिव मोहिते या बालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. तो बालक रस्त्याच्या बाजूने खेळत असताना विजेच्या वाहिन्या टाकण्याचे काम अर्धवट ठेवल्याने जमिनीवर राहिलेली वीज वाहिनी हिचा स्पर्श झाल्याने सालवड गावातील शिव मोहिते या बालकाचा मृत्यू झाला होता. तर बारणे गावातील एका आदिवासी कुटुंबातील दोन व्यक्तींचा शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तींचा वीज वाहिनीचा धक्का लागून मृत्यू झाला होता.







