बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणार : जिल्हाधिकारी

| उरण | वार्ताहर |
भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील बीपीसीएल (भारत पेट्रोलियम) प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी जिल्ह्याचा सेवक म्हणून निश्‍चित प्रयत्न करणार, अशी ग्वाही रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाच्या पदाधिकार्‍यांना दिली.

उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी आपल्या शेतजमिनी बीपीसीएल (भारत पेट्रोलियम) या प्रकल्पाच्या उभारणीसाठी संपादित करुन दिल्या आहेत. परंतु सदर प्रकल्प व्यवस्थापनांनी गेली अनेक वर्षे उर्वरित 70 ते 80 प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना नोकरीवर सामावून न घेता त्यांना वारंवार आश्‍वासनापलीकडे काहीच दिले नाही.त्यामुळे एकतर शेती गेली आणि नोकरी किंवा उदरनिर्वाहाचे साधन उरले नसल्याने सदर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.

सदर प्रकल्पग्रस्त भुमिपुत्रांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी दि17 आक्टोबर 2022 पासून बी पी सी एल (भारत पेट्रोलियम) प्रकल्पाच्या गेट समोर साखळी उपोषण सुरू केले आहे.सदर उपोषणाकडे प्रकल्प व्यवस्थापन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याचा निषेध म्हणून सोमवार दि13 मार्च रोजी 148 व्या दिवशी उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्त भुमिपुत्रांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी उरण तहसील कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा (महाराष्ट्र राज्य) च्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू केले असता जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे हे सोमवारी ( दि13) उरण तहसील कार्यालयात काही प्रशासकीय कामानिमित्त आले असता त्यांनी सदर आंदोलनकर्त्याची विचारणा केली. यावेळी प्रांत अधिकारी सुमन मुंडके, माजी आमदार मनोहर भोईर, संतोष पवार, सचिन डाऊर हे उपस्थित होते.

Exit mobile version