| पनवेल | प्रतिनिधी |
श्री ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे 31 वे पुष्प संपन्न झाले. पनवेल येथील गोंदवलेकर महाराज नामस्मरण केंद्रामधे संपन्न झालेल्या झालेल्या या कार्यक्रमात बनारस येथील कुणाल वर्मा यांनी आपली गायन सेवा सादर केली.
प्रसिद्ध गायक ओंकार दादरकर यांचे शिष्य असलेल्या कुणाल वर्मा यानी आपल्या संगीत सभेची सुरुवात पुरीया रागातील विलंबित एक तालातील बंदिशीने केली. त्यानंतर राग शंकरा मधील छोटा ख्याल सादर केला. शास्त्रीय संगीत गायल्यानंतर त्यांनी ‘राम रंगी रंगले, विष्णुमय जग, अबीर गुलाल’ ही भक्तिगीते सादर केली. त्यानंतर ‘जय गंगे भागीरथी’ हे नाट्यगीत सादर केले. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या भैरवीने त्यानी संगीत सभेची सांगता केली.
कुणाल वर्मा याना अथर्व देव यांनी संवादिनी, गौरव बॅनर्जी यांनी तबला साथ तर गणेश घाणेकर यांनी तालवाद्यसाथ केली. समीर सोमण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नामस्मरण केंद्रातील कार्यकर्त्यांनी संगीत सभा यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.







