ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभा संपन्न

। पनवेल । वार्ताहर ।

श्री ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे 34 वे पुष्प संपन्न झाले. पनवेल येथील गोंदवलेकर महाराज नामस्मरण केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पुणे येथील युवा गायिका ईश्‍वरी कुलकर्णी-श्रीगार यांनी आपली सेवा सादर केली. ईश्‍वरी ह्यांनी आपल्या संगीत सभेची सुरुवात राग श्याम कल्याणमधील ‘जियो मेरो लाल’ ही बंदिश आणि ‘सावन की सांज भयी’ ही बंदिश गाऊन केली. यानंतर त्यांनी ‘बेला सांज की’ ही बंदिश, राग मेघमधील ’मेघश्याम घनश्याम’ हा तराणा व कजरी हा गायन प्रकारदेखील सादर केला. यानंतर त्यांनी सुर निरागस हो, अमृताहुनी गोड, बाजे रे मुरलीया बाजे, उघड नयन देवा हे अभंग आणि काटा रुते कुणाला व का धरिला परदेस ही नाट्यगीते सादर केली. तसेच, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ या अभंगाने त्याने संगीत सभेची सांगता केली.

यावेळी राजेंद्र काळे यानी संवादिनी, शार्दुल डोंगरे तबलासाथ व गणेश घाणेकर यांनी तालवाद्यसाथ केली. सुखदा मुळ्ये-घाणेकर यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर, संगीत सभा यशस्वी करण्यासाठी आयोजकांसह केंद्रातील कार्यकर्त्यानी मोलाचे योगदान दिले.

Exit mobile version