। पनवेल । प्रतिनिधी ।
श्री ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे तिसावे पुष्प संपन्न झाले. पनवेल येथील गोंदवलेकर महाराज नामस्मरण केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड येथील स्वरा किंबहुने या बालगायिकेने आपली गायन सेवा सादर केली. विदुषी अपूर्वा गोखले यांची शिष्या असलेल्या व अवघे नऊ वर्षे वय असलेल्या स्वरा हिने आपल्या मधुर गायकीने रसिक पनवेलकरांना मंत्रमुग्ध केले.
संगीत सभेचा प्रारंभ राग भीमपलास मधील ‘अब तो बड़ी बेर’ या बड़ा ख्यालाने केला. नंतर तिने ‘ना मैं खेलुंगी होरी कान्हा संग’ ही ठुमरी सादर केली. त्यानंतर तिने हंसध्वनी रागात ‘जानी जानी री जग की ये रीत’ हा तराणा सादर केला. यानंतर गणेश स्तवन, कौसल्येचा राम, बाई मी विकत घेतला शाम, बाजे रे मुरलिया बाजे, रूनुझुणू रूणुझुणु रे भ्रमरा, घेता नाम विठोबाचे, ऋतुराज आज वनी आला, मी पुन्हा वनांतरी, नारायणा रमारमणा, ही भक्तीगीते व नाट्यपदे गावून रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. नंतर तिने ‘बाजे किशन की’ या भैरवीने संगीत सभेची सांगता केली.