| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
चंद्राच्या पृष्ठभागावर एवढे खड्डे नसतील, तेवढे खड्डे सध्या पनवेलमधील रस्त्यांवर पडल्याचे चित्र आहे. मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, या रस्त्यावरील खड्डे अनेक वेळा भरण्यात आले आहेत. परंतु, पावसाच्या एका सरीने या कामाचा दर्जा पुन्हा उघडकीस आणला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, या खड्डेमय रस्त्यावरच महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. येथे प्रसूती झाल्यानंतर नवजात बाळांना घेऊन माता आणि कुटुंबीयांना याच रस्त्यावरून घरी परतावे लागते. तसेच, परिसरात खासगी रुग्णालये असून, गर्भवती महिला तपासणीसाठी रिक्षा, चारचाकी किंवा अन्य वाहनातून याच मार्गावरून ये-जा करतात. या खड्ड्यांमुळे वाहनांना होणारे हादरे गर्भवती महिला, रुग्ण आणि नवजात बाळांसाठी त्रासदायक ठरत आहेत. तसेच, रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रिक्षा आणि चारचाकी वाहनांनाही खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे. वारंवार डागडुजी करूनही रस्ता पुन्हा उखडत असल्याने खड्डे बुंजविण्याचे काम कोणत्या दर्जाचे केले जाते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना त्याचा नागरिकांना अपेक्षित फायदा का होत नाही, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.







