एक महिला ठार; 21 जण जखमी
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली परिसरात शनिवारी (दि. 26) सकाळी एक भीषण अपघात झाला. एका ब्रेक फेल ट्रेलरने जवळपास 15-20 गाड्यांना धडक दिली. या अपघातात एक महिला ठार झाली असून 21 जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर किलोमीटर 39 म्हणजे नवीन बोगद्याच्या अलीकडे एका ट्रेलरचे ब्रेक फेल झाले. या दरम्यान महामार्गवर तीव्र उतार असल्याने त्याचा वेग वाढला. ट्रेलरचालकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुढे जात असलेल्या एका स्कारपियो गाडीला धडक दिली. परंतु, त्याने न थांबता समोर चालणाऱ्या प्रत्येक वाहनाला धडक देत पुढे जाऊ लागला.
नवीन बोगदा ते फूडमोल या रस्त्यादरम्यान त्या कंटेनरने विविध कंपन्याच्या कार, ट्रक, कंटेनर, मिनिबस यांना धडक दिली. तर काही वाहने विशेष करून कार एकमेकांवर आदळल्या. यात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, काही गाड्या अक्षरशः चक्काचूर झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, आयआरबीची देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, पोलीस तेथे तात्काळ पोहचले. या अपघाताने मुंबई लेन पूर्ण बंद होऊन वाहतूक कोंडी झाली होती. हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी तात्काळ जखमींना वाहनाबाहेर काढून उपचारासाठी खोपोलीच्या रुग्णालयात हलवले.
या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून जवळपास 21 प्रवासी जखमी झाले. त्यातील 9 जणांना पुढील उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच, पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने युद्ध पातळीवर बाजूला काढून मुंबई लेन वाहतुकीसाठी खुली केली.






