अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला फाटा

। वाशिम । वृत्तसस्था ।
व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या अस्थी किंवा रक्षा पाण्यामध्ये सोडायच्या, अशी पारंपारिक प्रथा आहे. पण याच प्रथेला फाटा देऊन आपल्या आईची राख आपल्याच शेतात पसरवून वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.

अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला फाटा देत आईची रक्षा शेतजमिनीत पसरवून मंगरूळपीर तालुक्यातील झोलेबाबा येथील ज्ञानेश्‍वर डोंगरे, योगेश डोंगरे, हरेश्‍वर डोंगरे या शेतकरी पुत्रांनी नवा पायंडा घालत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार पार पाडून अस्थी नदीपात्रात विसर्जित करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. यामुळे मृतात्म्यास मोक्ष मिळतो, असा समज आहे. परंतु अलीकडच्या काळात नदीपात्रातील पाणी दूषित होऊ नये, या उदात्त हेतूने आईच्या अस्थी व रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता शेतात विसर्जित करीत आहेत.याकामी चिखली झोलेबाबा येथील ज्ञानेश्‍वर डोंगरे, योगेश डोंगरे, हरेश्‍वर डोंगरे या तिघा भावंडांनी पुढाकार घेतला. डोंगरे भावंडांनी उचलेल्या स्तुत्य पावलाचं पंचक्रोशीत कौतुक होत आहे. डोंगरे भावंडांनी घालून दिलेल्या आदर्शावर इतरांनीही चाललं पाहिजे, किंबहुना ती काळाजी गरज असल्याची भावना गावकर्‍यांनी बोलून दाखवली.

Exit mobile version