खा. अमोल कोल्हेंचा निर्णय
| पुणे | प्रतिनिधी |
शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत अनेक कामे केली आहेत. अनेक प्रकल्प मंजूर करून आणले आहेत. माझ्या मतदारसंघात कामे सुरू असलेले व कामे सुरू होणारे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार असून, त्यासाठी पुढील पाच वर्षे मालिका क्षेत्रातील अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न गेल्या पाच वर्षांत आपण मार्गी लावले आहेत. पुणे-नाशिक, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे- नगर या महामार्गांच्या कामासाठी आपण तब्बल साडेएकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून आणलाय, याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
पंधरा वर्षांत एका व्यक्तीला खासदारकीची संधी दिल्यानंतर पंधरा वर्षांत त्यांनी शिरूर मतदारसंघात एकही मोठा प्रोजेक्ट आला नव्हता. मात्र, माझ्या अवघ्या पाच वर्षांत हे सर्व प्रोजेक्ट आले आहेत, मार्गी लागले आहेत. ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकण्याचे ठरविले आहे त्यांच्यासाठी मला मालिका विश्वातील अभिनयातून पाच वर्षे ब्रेक घ्यावा लागेल, असेही खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.