सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, भाकरवड-देहेन जिल्ह्यातील सहाण, सुडकोली, देहेन या तीन पुलांसह तीन स्लॅब कलवर्ट धोकादायक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पुलांवरून अवजड वाहतुकीला बंदी केली आहे. त्यामध्ये सर्वसामान्यांची वाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या एसटी बसचीदेखील या पुलांवरून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह, प्रवासी, व सणासुदीमध्ये गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे.
अलिबाग-रोहा मार्गासह अलिबाग-रेवदंडा मार्गावरील पुल जूने झाले आहेत.या पुलावर दरवर्षी पावसाळ्या पूर्वी फलक लावून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते. दरवर्षी पावसाळ्यात हा खेळखंडोबा सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुरू असतो. परंतु पावसाळ्यापुर्वी नादुरुस्त पुल दुरुस्त करून ते वाहतूकीस सुस्थितीत ठेवण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन ठरला आहे.
अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हयातील महत्वाच्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट पावसाळ्यात करून सर्वसामान्यांना वेठीस धरले असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे. जिल्ह्यात दहीहंडीसह गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे अलिबागसह रायगड जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. मुंबई, बोरीवली, ठाणे येथील चाकरमानी सुट्टी काढून गावी येतात. परंतु धोकादायक पुलावरून एसटी सेवा बंद झाल्याने प्रवासी, विद्यार्थी व गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी गावातून जात नसल्याने अनेकांनी खासगी वाहनांचा आधार घेण्यावर भर दिला आहे.
पर्यायी रस्त्यावरील पुलच धोकादायक
अलिबाग तालुक्यातील सहाण-नागाव मार्गावरील पाल्हे हा पुल स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये अवजड वाहतूकीसाठी धोकादायक ठरला आहेत. तसेच अलिबाग - रेवदंडा मार्गावरील नवेदरपूलाचादेखील यामध्ये समावेश आहे. नवेदर बेली येथील पुल धोकादायक ठरविल्याने एसटी महामंडळाने पर्यायी रस्ता म्हणून सहाण- पाल्हे मार्गावरून बसेस सुरू ठेवण्याची सुचना विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र पर्यायी रस्त्यावरील सहाण बायपास येथील पाल्हे पुलच धोकादायक आहे, याबाबत एसटी महामंडळ रायगड विभाग अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
एसटीच्या वाहतूक मार्गात बदल
अलिबाग -रोहा मार्गावरील काही पुल व स्लॅब कलवर्ट धोकादायक आढळून आले आहेत. या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याची सुचना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. अलिबागहून थेट रोहामध्ये बसेस न पाठविता फक्त महान फाट्यापर्यंत सोडल्या जात आहे. रोहामधून अलिबागला जाणाऱ्या गाड्या सुडकोलीपर्यंत पाठविल्या जात आहेत. एसटीच्या वाहतूक बदलाचा फटका नवघर, नांगरवाडी, भोनंग आक्षी, नागाव, बेली, ताजपूर या गावांसह इतर वाड्यांमधील प्रवाशांंना बसला आहे.
पावसाळ्यापूर्वी धोकादायक पुलाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फलक लावले जातात. पुल कमकूवत आहे, वाहने सावकाश चालवा असे आवाहन या फलकांद्वारे केले जाते. दरवर्षी फलक लावण्याऐवजी त्या पुलांची दुरुस्ती केली असती, तर आताही समस्या निर्माण झाली नसती. सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. पूलावरून एसटी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे खुप हाल होत आहेत. एसटीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
अमित म्हात्रे
सामाजिक कार्यकर्ते







