सासवणे येथे ब्रेक वॉटर बंधार्‍याची आ. जयंत पाटील यांची मागणी

। मुंबई । दिलीप जाधव ।
सासवणे येथील मच्छीमारांच्या बोटी सुरक्षित राखण्यासाठी समुद्रामध्ये बंधारा बांधण्याबाबत शेकापक्षाचे आ. जयंत पाटील यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे सदनाने लक्ष वेधले. यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी सदर प्रस्ताव स्वीकारून शासनाचे लक्ष वेधले. सासवणे गावात सुमारे 80 ते 90 मासेमारी नौका असून सासवणे येथील समुद्र किनार्‍यावर नौका नांगरून सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे समुद्रात मासेमारी करीत असताना नैसर्गिक वादळ तसेच हवामानातील बदलांमुळे मासेमारी नौका समुद्र किनार्‍यावर घेऊन याव्या लागतात. अशावेळी समुद्र खवळलेला असल्यामुळे समुद्र किनार्‍यावर मोठमोठ्या लाटा निर्माण होतात अशा परिस्थितीत नौका समुद्र किनारी घेऊन येणे धोकादायक असल्यामुळे किनार्‍यावर असलेल्या नौकांना हि धोका निर्माण होतो. सदर नौका या मांडवा बंदर येथे घेऊन जाव्या लागतात. मांडवा बंदर येथे नौका घेऊन जाताना अनेक वेळा नौकांची दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात नौकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सासवणे येथील मच्छीमारांच्या नौका सासवणे येथील समुद्र किनारी सुरक्षित नांगरून ठेवण्यासाठी येथील समुद्रामध्ये ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी शेकापक्षाचे आ. जयंत पाटील यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली आहे.

Exit mobile version