। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारीला राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी एकही परवाना देण्यात आलेला नाही. यामुळे अनेक नौकामालकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे. नौकामालक यामुळे अस्वस्थ झाले असून, पर्ससीन नेट नौका विकण्याचा सपाटा सुरू झाला आहे. काही पर्ससीन नेट नौका राज्याच्या समुद्र क्षेत्राबाहेर म्हणजे 12 नॉटिकल मैलांच्या पुढे खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. यामुळे नौकामालकांचा आर्थिक खर्चदेखील वाढला आहे.
पर्ससीन नेट मासेमारीला 1 सप्टेंबरपासून सुरूवात झालेली आहे. राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी या नौकांना सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून मासेमारी नौका नूतनीकरण परवाना, बंदर परवाना दिला जातो. परंतु, चालू हंगामात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला गेलेला नाही. राज्यातील मासेमारी धोरणाचा सोमवंशी अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या 167 कि.मी. समुद्र क्षेत्रात 183 पर्ससीन नेट नौका ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. अहवालातील इतर सूचनांनुसार फेब्रुवारी 2016 साली राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पर्ससीन नेट मासेमारी आठ महिन्यांवरून चार महिन्यांवर आणण्यात आली होती. शासनाने आता तर नौका नूतनीकरण परवाने देण्याबाबत सूचना केलेल्या नाहीत. यामुळे एकाही पर्ससीन नौकेला सहायक मत्स्यव्यवसाय विभागाकडून कोणताही परवाना देण्यात आलेला नाही.
जिल्ह्यात 474 पर्ससीन नौका होत्या. खर्चाच्या तुलनेत मासे न मिळणे, समुद्रातील वातावरणाची अनिश्चितता अशा विविध कारणांमुळे पर्ससीन नेट नौका कमी होत गेल्या आहेत. गेल्या वर्षी या नौकांची संख्या 280 पर्यंत आली होती. शासनाच्या सूचनेनुसार 183 नौकांनाच परवाने देण्याची तयारी सुरू होती; परंतु या संदर्भात परवाना नूतनीकरणाबाबत कोणतेही निर्देश न आल्याने एकाही नौकेला राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे अनेक पर्ससीन नेट नौका नाहिलाजाने विकल्या जात आहेत. तसेच, अनेक नौका बंदरातच उभ्या ठेवण्यात आल्या असून काही नौका राज्याच्या समुद्र क्षेत्राबाहेर म्हणजेच केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. हे अंतर मोठे असल्याने नौकेचे इंधन व इतर खर्च अधिक वाढला आहे.