ब्रेकिंग: राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून पाठिंबा काढणार?

। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेनेत सुरु असलेल्या अंतर्गत कलहानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढणार असल्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज वाय.बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारमधील पाठिंबा काढला तर ठाकरे सरकार खरंच कोसळू शकतं. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड नाराज झाले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षच हायजॅक केल्याचं चित्र आहे. कारण शिवसेनेच्या सर्वाधिक आमदार आणि खासदारांचा शिंदेंना पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेत फुट पडल्याचं चित्र आहे. या दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं. संजय राऊतांनी बंडखोरांना परत येण्याचं आवाहन करत असताना शिवसेना सरकारमधून बाहेर पडायला तयार असल्याचं विधान केलं. संजय राऊत यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु आहे. या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीवर चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसदेखील सरकारमधून पाठिंबा काढण्याबाबत चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिल आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Exit mobile version