उपकरणांसाठी अर्थसंकल्पात 78 कोटी रुपयांची तरतूद
। रायगड । प्रतिनिधी ।
राज्य सरकारने सादर केलेल्या 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अतिरिक्त बजेटमध्ये राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यासाठी 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
देशात स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. भारतात स्तनाच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. वेळेवर निदान केल्यास 98 टक्के प्रकरणांमध्ये जीव वाचू शकतो. या दिशेने पावले उचलत राज्य सरकारने या दोन्ही कर्करोगांचे स्क्रीनिंग लोकांना त्यांच्या घराजवळ उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पामध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीवर भर देण्यात आला आहे. राज्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रुग्णालये जनस्वास्थ्य योजनेशी जोडणार
राज्यातील एकही नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनस्वास्थ्य योजना सुरू करण्यात आली आहे. नुकताच राज्य सरकारने या योजनेचा आरोग्य विमा निधी दीड लाखांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढवला आहे. आतापर्यंत एक हजार रुग्णालये या योजनेशी जोडण्यात आली होती. अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने या योजनेत आणखी 900 रुग्णालये जोडली आहेत. यासोबतच या योजनेंतर्गत 1,356 आजारांवर उपचारांचाही अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला आहे.
नवीन रुग्णवाहिका
राज्यात रुग्णांना, विशेषत: गरोदर महिला आणि बालकांना घर ते रुग्णालयात आणि रुग्णालयातून घरापर्यंत नेण्यासाठी तीन हजार 324 रुग्णवाहिकांची सेवा मोफत दिली जाते. यातील बहुतांश रुग्णवाहिका जुन्या असून त्या बदलून नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली आहे.