लाचखोरीचे प्रकरण: कार्यकारी अभियंता अडचणीत सापडणार?

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील श्रीवर्धनमधील उपअभियंता मोरे यांना लाचप्रकरणी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी अडचणीत सापडणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील भावे बौद्धवाडीमधील सभागृहाच्या बांधकामाला 2023-24 या कालावधीत सात लाख रुपयांचा ठेका मिळाला होता. मंजूर झालेल्या बिलाची टक्केवारी म्हणून दोन हजार पाचशे रुपये आणि उर्वरित पाच लाख 60 हजार रुपयांचे बिल कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठविण्याच्या मोबदल्यात आणि मंजूर करण्यास मदत करण्यासाठी दहा हजार 500 असे एकूण 13 हजार रुपयांची लाच उपअभियंता प्रवीण मोरे यांनी मागितली होती. गुरुवारी दहा हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले. त्याला माणगाव येथील न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रायगड जिल्हा परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राज सुरु आहे. वेगवेगळ्या विभागातील अधिकारी जिल्ह्यातील कारभार चालवत आहेत. जिल्हा परिषद अखत्यारित येणार्‍या ग्रामीण भागातील रस्ते व इतर कामांची मंजुरी बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या सहीने मिळत असल्याची चर्चा आहे. या कार्यालयात वेगवेगळ्या कामाची टक्केवारी घेत असल्याचा प्रकार या घटनेनंतर उघड झाला आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोरेंच्या मालमत्तेची होणार चौकशी
श्रीवर्धन उपविभागाचे उपअभियंता प्रवीण मोरे यांच्याविरोधात रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यांच्या मालमत्तेची या विभागामार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठीशी लागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार ऑनलाईन सुरु झाला आहे. त्यामुळे बिल मंजूर करण्यासाठी मदत घेण्याचा संबंध येत नाही. संबंधित प्रकरणात माझ्याकडून कोणत्याही प्रकारची मागणी करण्यात आली नाही.

राहुल देवांग,
कार्यकारी अभियंता,
रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग

Exit mobile version