| पोलादपूर | वार्ताहर |
तहसील कार्यालयामध्ये गेल्या दोन वर्षापासून तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या कपिल घोरपडे यांच्याविरूध्द न्याय प्रविष्ट प्रकरणात 3 लाखांची मागणी करून तडजोडीत अडीच लाख घेण्याचे मान्य करून लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिनीच्या तफावती बाबत दावा तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या इसमाने दाखल केला होता. दाव्याचा निर्णय देऊन आदेशाची प्रत देण्याकरिता 31 जानेवारी 2025 रोजी तक्रारदार यांचेकडे आरोपी तहसीलदार पोलादपूर लोकसेवक कपिल तुकाराम घोरपडे यांनी 3 लाखांच्या लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार दि.3 फेब्रुवारी 2025 रोजी प्राप्त झाली होती. तडजोडीअंती तडजोडी अंती 2 लाख 50 हजार रूपये रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या तक्रारीनुसार तहसीलदार घोरपडे यांनी लाच मागितल्याची खात्री लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. मात्र, 5 फेब्रुवारी 2025 रोजी व 18 फेब्रुवारी 2025 रोजी आरोपी लोकसेवक तहसिलदार कपिल घोरपडे यांच्याविरुध्द सापळा लावण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड अलिबागचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक संतोष भिसे, सपोनि विनोद जाधव व सपोनि अरूण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील, सचिन आटपाडकर, सागर पाटील या पथकाने याप्रकरणी पोलादपूर येथे ठाण मांडून कसोशीने हा सापळा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. यामुळे आरोपी लोकसेवक पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याविरुध्द पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1888चे कलम 7 प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकामी ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर व अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यातील तक्रारदाराचे नाव निलेश विजय आंबेतकर असून, त्यांचे वडील पोलादपूर तहसिल कार्यालयातून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. पोलादपूर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून लोकाभिमुख अधिकारी म्हणून काम केलेल्या तहसिलदार कपिल घोरपडे यांच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.