तरुणाच्या मृत्यूप्रकरणी संतप्त जमावाने बसवर केली दगडफेक
। रायगड । खास प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील एसटी आगारासमोर एसटी बसने दुचाकीस्वाराला चिरडल्याची मन हेलावून टाकणारी घटना गुरुवारी (दि.27) घडली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जयदीप बना (रा.वरसोली कोळीवाडा) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव असून, याबाबत त्याच्या घरी समजताच बना परिवारावर शोककळा पसरली. परिसर सुन्न झाला, त्याच्या नातेवाईकाने थेट बसस्थानक गाठले. पोटचा गोळा क्षणात निधून गेल्याचे समजताच तिने हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून संपूर्ण अलिबागकर हळहळले, तर गावातील नागरिक संतापले.
रोजच्याप्रमाणे अलिबाग आगारासमोरील रस्त्यावर वर्दळ होती. डॉ. धनेषा राणे यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, पावणेबाराच्या सुमारास अलिबाग बस आगारामध्ये एसटी जात होती. त्यावेळी समोरुन चारचाकी वाहन आल्याने चालकाने बसचा वेग कमी केला. त्याचवेळी मागून दुचाकीवरुन जयदीप व रिक्षा आली. समोरील वाहनाने वेग कमी केल्याने त्यानेही वेग कमी केला. त्यानंतर त्या वाहनांच्या मागून येणार्या एसटी बसने प्रथम रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळे रिक्षा डिव्हायडरवर आदळली व मोटारसायकलस्वार समोरील एसटीवर आदळला. डॉ. धनेषा राणे यांनी तरुणाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तर, बस चालकाने तेथून पळ काढला.
ही घटना घडताच नागरिकांचा राग अनावर झाला. तरुणाने डोळ्यादेखत अखेरचा श्वास घेतला होता. त्यामुळे संतप्त जमावाने एसटीच्या काचा फोडल्या. वाहतूक तब्बल चार तास रोखून धरली. अखेर पोलिसांनी मध्यस्थीची भुमिका घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, आरोपी चालक योगेश अडसूळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत.
पोलिसांकडून लाठीचा धाक
या घटनेची माहिती मिळताच जमाव मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाला. त्यांनी एसटी आगार परिसरात गर्दी केली होती. संतप्त झालेल्या जमावाने एसटी बसवर दगडफेक केली. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. जमावाने गोंधळ घातल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. एसटी चालकाला तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. अखेर जमावाला शांत करण्यासाठी पोलीसांनी लाठीचा धाक दाखवला.
नादुरुस्त गाड्यांचा हट्ट का?
एसटी बसचा ब्रेक फेल होत असण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. याबाबत आगार व्यवस्थापकांना सांगण्यात येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. मात्र, आधीच बस गाड्यांची कमतरता असल्याने त्याच नादुरुस्त बस प्रवाशांच्या सेवेला पाठवण्यात येत असल्याची धक्कादायक बाब यानिमित्ताने समोर आली. यापुर्वीही रस्त्यामध्ये अचानक बस नादुरुस्त होत असल्याचे आपल्या निर्दशनास येते. काही दिवसांपूर्वी अलिबाग-रेवस मार्गावर जाणार्या बसचे ब्रेक निकामी झाले होते. त्यावेळी एका महिलेला ठोकर लागणार होती, तोच चाकलकाने प्रसंगवधान दाखवल्याने बस समोरील झाडाला ठोकली होती. मात्र, हे प्रकरण आगार प्रशासनाने रफादफा केले होते.
घटनास्थळी क्राईम सीन एसटी-दुचाकीच्या झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी क्राईम सीन करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बसचा ब्रेक फेल झाला आहे का, याची चाचपणी केली. यासाठी पोलीस चालकाला बस चालवण्यास सांगण्यात आले. त्यांनी बस चालवताना ब्रेक व्यवस्थीत काम करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जमावाने पुन्हा गोंधळ घातला. त्यानंतर घटनास्थळावरुन तीन्ही वाहने अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा पुरावा
अलिबाग एसटी आगागर परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे लवकरच सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दुभाजकाची लांबी कमी करण्याची मागणी बासणात
एसटी आगार परिसरात फेरीवाले, भाजी विक्रेत, अवैध पार्कींग होत असते. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. त्यातच तिथे असणार्या दुभाजकांची लांबी अधिक असल्याने एसटी बस चालकांना वळसा घेताना कसरत करावी लागते. दुभाजकांची लांबी कमी करावी, अशी मागणी अलिबाग शहर काँग्रेसचे अध्यक्ष समीर ठाकूर यांनी केली आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही कार्यवाही झाली नाही.