महाड तहसील कार्यालयातील लाचखोर अव्वल कारकूनला अटक

। महाड । प्रतिनिधी ।
महाड तहसील कार्यालयातील कारकुनास लाच घेताना अटक करण्यात आली.त्याच्यासह कार्यालयाबाहेर असलेल्या झेरॉक्स चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दाभेकर कोंड येथील जमिनीचा भोगवटा वर्ग दोन ऐवजी एक करायचा होता. यासाठी अव्वल कारकून प्रमोद साहेबराव माळवे, रा.काकरतळे याने तक्रारदाराकडे या कामाच्या मोबदल्यात तीस हजाराची मागणी केली होती.

तक्रारदाराने माळवी याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अलिबाग यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. त्याप्रमाणे रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता, माळवे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून जयंत रामा मोरे श्री कृपा झेरॉक्स सेंटर, रा.करंजखोल नातेखिंड, महाड या खाजगी मदतनिसामार्फत तीस हजार रुपये स्वीकारत असताना पथकाने रंगेहात पकडले. पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड विभागाच्या पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुषमा सोनवणे, पोलीस निरीक्षक जाधव पोलीस, पोह शरद नाईक पोलीस हवालदार महेश पाटील यांनी हा सापळा यशस्वी केला.

Exit mobile version