अवकाळीमुळे धंदा मातीमोल

वीटभट्टी मालक आर्थिक संकटात

| नेरळ | प्रतिनिधी |

दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात भाजीपाला शेतीचे आणि मातीच्या वीटभट्टी उत्पादक यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. कर्जत तालुक्यात वीटभट्टी चालक मालक संघटनेकडून नोंदणीकृत असलेल्या 125 वीटभट्टी उत्पादक या सर्वांचे या अवकाळी पावसाने नुकसान केले.


अवकाळी पावसाचे ढग राज्याच्या विविध भागात कोसळत असताना गारपीट झाल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे. अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यात दोन दिवस हजेरी लावली, मात्र 21 मार्च रोजी सकाळी दोन तास पावसाळ्यात कोसळतो, त्या प्रकारे पावसाने हजेरी लावली होती. तब्बल दोन अडीच तास कोसळलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतपिके आणि वीटभट्टी उत्पादक यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात साधारण 125 मोठे वीटभट्टी उत्पादक असून, त्यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात विटा बनविण्याचे काम नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांचे कालावधीत होत असते. त्या विटांची भट्टी बनविण्यावर वीटभट्टी मालक सुस्कारा सोडत असतो. मात्र, यावर्षी अवकाळी पावसामुळे जमिनीवर कामगार वर्गाने थापून ठेवलेल्या विटा अवकाळी पाऊस आला आणि पुन्हा मातीमध्ये रुपांतरीत झाल्या आहेत. त्याचा परिणाम विटा बनविण्यासाठी लागलेली मेहनत मातीमोल गेली असून, अशा प्रकारचे नुकसान कर्जत तालुक्यातील बहुसंख्य वीटभट्टी उत्पादक यांचे झाले आहे.

वीटभट्टी मजुरांनी बनवून वाळवायला ठेवलेला कच्चा माल तुटून पडला आहे. तर उघडा असलेला कोळसा भिजला आहे. त्याचबरोबर लावलेल्या भट्ट्यादेखील काही ठिकाणी कोलमडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात सर्व वीटभट्टी चालकांचे नुकसान झाले आहे.

राजेश लाड, वीटभट्टी उत्पादक, कर्जत

शासनाकडून उचललेल्या मातीबाबत सतत स्वामित्व शुल्क भरण्याचा तगादा असतो. त्यामुळे रॉयल्टी वेळेवर भारावीच लागते, मात्र नुकसान झाल्यावर शासन अजिबात लक्ष देत नाहीत आणि महसूल खात्याने आमच्या नुकसानीची साधी पाहणी केली नाही.

सुरेश राणे, वीटभट्टी उत्पादक, नेरळ
Exit mobile version