आपला दक्षिणेकडील शेजारी असलेल्या श्रीलंकेचे दिवाळे वाजले आहे. परदेशी कर्जे फेडता येणे तूर्त शक्य होणार नाही असे तिथल्या मध्यवर्ती बँकेने मंगळवारी जाहीर केले. कारण, जे काही परकीय चलन आहे ते धान्य, औषधे, पेट्रोल वगैरेंच्या आयातीला देखील पुरेसे नाही. परदेशस्थ श्रीलंकन लोकांनी देणग्या दिल्या तर अन्नधान्य आयात करायला उपयोग होईल, अशी भीक मागण्याची पाळी तेथील सरकारवर आली आहे. श्रीलंकेची लोकसंख्या दोन कोटी वीस लाख आहे. म्हणजे आपल्या कर्जत ते पालघरपर्यंत पसरलेल्या महामुंबईपेक्षा थोडासाच मोठा असा हा देश आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. पेट्रोलअभावी गाड्या रस्त्यात बंद पडत आहेत. तिथून त्या हटवायलाही अडचणी येत आहेत. दिवसाला कित्येक तास वीज नसणे हे नित्याचे झाले आहे. भाज्या, फळे, दूध यांचे दर शेकडो पटीने वाढले आहेत. एकेकाळी आर्थिकदृष्ट्या गुटगुटीत असलेल्या या देशात आता महागाई व टंचाईने कहर केला आहे. मध्यंतरी तांदुळ पाचशे रुपये किलो तर साखर तीनशे रुपये किलो झाल्याच्या बातम्या होत्या. इतकी किंमत मोजूनही या वस्तू मिळतील याचा काही भरवसा नसतो तो वेगळाच. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तिथे ठिकठिकाणी लोकांची आंदोलने चालू आहेत. अशावेळी सरकारे करतात तशी दडपशाही सुरू झाली. आणीबाणी आणि रस्त्यांवर संचारबंदी लागू करण्यात आली. पण लोकांनी न जुमानल्यानं सरकारला माघार घ्यावी लागली. विशेष म्हणजे आजवर श्रीलंकेत श्रीलंकन वंशाचे लोक विरुध्द तमीळ असा सतत संघर्ष असे. स्वतंत्र तमीळ देशासाठी कित्येक वर्ष चाललेली यादवी प्रभाकरन मारला गेल्यावर थांबली असली तरी समाजातील सुप्त तेढ कायम होती. याखेरीज राजकीय सुंदोपसुंदी होतीच. आपल्याकडे हिंदू-मुस्लिम असा वाद सतत भडकत ठेवण्यात जसे काहींचे राजकारण गुंतलेले आहे तसेच तेथेही आहे. मात्र आता महागाई, टंचाई आणि बेकारी यांचा रेटा इतका जबरदस्त आहे की, सर्व समाज सरकारच्या विरोधात एक झाला आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सर्व सत्ता स्वतःच्या कुटुंबियांमध्येच वाटली होती. पंतप्रधानपदी त्यांचेच थोरले बंधू महिंदा राजपक्षे आहेत. इतर महत्वाच्या पदांवरही यांचेच कुटुंबीय आहेत. 2020 मध्ये गोटाबाय यांनी कायद्यात अनेक दुरुस्त्या करून सत्ता पूर्णपणे आपल्या कबजात घेतली होती. पण शेवटी पैशांचे सोंग आणता येत नाही. तीन वर्षांपूर्वी, चर्चमध्ये झालेले भीषण बाँबस्फोट आणि नंतर आलेला कोरोना याने श्रीलंकेचे पुरते कंबरडे मोडले. त्या देशात परदेशी पर्यटक येईनासे झाले. त्यातूनच परकीय चलनाचा प्रश्न निर्माण झाला व आजची स्थिती उद्भवली. मध्येच आपल्याकडच्या झिरो बजेट शेतीसारखे एक फॅड राजपक्षे सरकारने काढले. रासायनिक खतांवर बंदी घातली. तांदुळ पिकलाच नाही. मोठी गुंतवणूक करतो आहे म्हणून चीन सरकारला वाटेल त्या सवलती दिल्या. त्यातून देशच गहाण पडायची वेळ आली. लक्षात घ्यायचे ते असे की हे सर्व डोळ्यादेखत होऊनही जनतेने ते बराच काळ चालवून घेतले. त्या त्या वेळी विरोध केला नाही. आता त्याच सरकारविरुद्ध बंड सुरू झाले आहे. विरोधी पक्षांनी अविश्वासाचा ठराव मांडला आहे. सत्तारुढ पक्षातून चाळीसच्या वर खासदार फुटले आहेत. आज ना उद्या राजपक्षे यांची अखेर होणार हे नक्की आहे. ते कदाचित पळून जातील किंवा देशात त्यांच्याविरुध्द एखादा खटलाही उभा राहील. पण मधल्या काळात त्यांनी देशाचे जे नुकसान केले ते सहजासहजी भरून निघणारे नाही. लंकेत सोन्याच्या विटा असल्या तरी आपल्या काय कामाच्या अशी मराठी म्हण आहे. आता लंकेत मातीच्याच विटा असल्याचे दिसते आहे. आणि या मातीच्या विटांपासून आपल्याला काही धडे घेण्यासारखे आहेत. एक म्हणजे बेकारी, भाववाढ यासारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून भलत्याच गोष्टींना महत्व दिले तर अंतिमतः आपल्याच गळ्याला फास बसतो. दुसरे म्हणजे असे दुर्लक्ष करायला लावणार्या राज्यकर्त्याला वेळीच जाब विचारला नाही तर सर्व राष्ट्रच खड्डयात जाऊ शकते.
लंकेत मातीच्याच विटा

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025