राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी निवड
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या तरणखोप येथील पेण तरणखोप रोडवरील इजीमा 56 भोगावती नदीवरील उच्चस्तरीय पुलाची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘उत्कृष्ट पूल’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पेणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 11 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सन 2025-26 करिता सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय व वैशिष्ट्यूर्ण बांधकामांना ‘उत्कृष्ट रस्ता’, ‘उत्कृष्ट पूल’ आणि ‘उत्कृष्ट इमारत’ या तीन विभागांत पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पेण तालुक्यातील तरणखोप येथील रोडवरील भोगावती नदीवर उभारण्यात आलेल्या 100 मीटर लांबीच्या उच्चस्तरीय पुलाची ‘उत्कृष्ट पूल’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
या पुलामुळे पेण-तरणखोप मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत झाली असून, परिसरातील नागरिकांच्या दळणवळणालाही मोठा हातभार लागला आहे. तांत्रिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आणि सार्वजनिक उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या या पुलाला राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी मिळालेली मान्यता ही पेण तालुक्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरस्काराच्या यादीत पेण तालुक्यातील पुलाचा समावेश झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
