प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील हेटवणे कालव्यावरील दहा लोखंडी पूल चोरीला गेले आहेत. परंतु, लाखो रुपयांचे साहित्य चोरीला जाऊनही जलसंपदा विभागाने दाखवलेली ढिलाई संतापजनक ठरत आहे. अधिकारी भेट टाळणे, केवळ अर्जावरच समाधान मानणे आणि एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केल्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हेटवणे कालव्यावरील लाखो रुपयांचे जुने साहित्य लंपास झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ अपेक्षित होती. मात्र, उलटपक्षी अधिकारी भेट टाळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आमच्या प्रतिनिधींनी चार वेळा कार्यालयात जाऊनही अधिकाऱ्यांनी मुद्दाम भेट टाळल्याचे दिसून आले. अखेर पाचव्या प्रयत्नात संबंधित कामावर देखरेख करणारे अधिकारी अल्पेश पाटील यांनी भेट दिली.
या भेटीत त्यांनी दिलेल्या माहितीतून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लाखो रुपयांचा सरकारी ऐवज चोरीला गेल्यानंतरही केवळ 6 मार्च 2026 रोजी पेण पोलीस ठाण्यात साधा तक्रार अर्ज दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, इतक्या मोठ्या घटनेनंतरही रीतसर एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. अल्पेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, तब्बल दहा पूल चोरीस गेले आहेत. बाजारमूल्याने लाखोंमध्ये जाणारे हे साहित्य गायब झाले असताना केवळ चार ओळींच्या अर्जावर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, हे पूल अत्यंत जड स्वरूपाचे असून, ते हटवण्यासाठी जेसीबी किंवा पोकलेनसारख्या यंत्रांची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर दहा पूल चोरीस जाणे सहज शक्य नाही. त्यामुळे हा प्रकार साधी चोरी नसून, नियोजनबद्ध कारवाई असल्याचा संशय व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, ठेकेदारांच्या यंत्रसामुग्रीच्या सहाय्यानेच हे पूल काढण्यात आले असावेत. असे असताना संबंधित अधिकाऱ्यांना याची कल्पना नसणे किंवा त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, हेही तितकेच गंभीर आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हा प्रकार निष्काळजीपणा आहे की जाणीवपूर्वक चालढकल, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. यावेळी अल्पेश पाटील यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
