कुंडलिका नदीवरील पूल वाहतूकिसाठी बंद

रोह्यात सलग दुसर्‍या दिवशी पावसाचे धूमशान सुरूच
। रोहा । प्रतिनिधी ।
रविवारी रात्रभर सुरू असलेल्या पावसाचे सोमवारी देखील धूमशान सुरूच असून तालुक्यातील कुंडलिका व अंबा या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडण्याची चिन्हे असल्याने कुंडलिका नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रोहा शहरातून वाहणार्‍या कुंडलिका नदीतील पाण्याच्या पातळीत दुपारी वाढ झाली. या नदीची धोक्याची पातळी 23.95 मी. असून सध्या 23.70 मी. इतकी नोंद करण्यात आली आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास रोहा शहराला पुराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच नागोठणे येथील अंबा नदीने देखील इशारा पातळी ओलांडली असून 8.75 मि वरून वाहत आहे. अंबा नदीची धोका पातळी 9 मिटर असून नागोठणे बस स्थानकात पाणी आले आहे.

तालुक्यात मागील 24 तासात 202 मिमी पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आजपर्यंत 2045 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरीच्या 62 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुंडलिका नदी इशारा पातळीच्या वरून वाहत असल्याने जुना पूल खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नवीन पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version