विना परवानगी पुलाचे काम

जि.प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील म्हात्रे फाटा ते सासवणे रस्त्यावरील पूल (मोरी) जीर्ण झाली होती. या मोरीचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाची परवानगी न घेता धनदांगड्यांच्या भल्यासाठी काही ठेकेदारांनी केले आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. त्यात या पुलाचे काम जून्याच पिलरच्या भरवश्यावर करण्यात आल्याने अवजड वाहनांमुळे हा पुल धोकादायक बनण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

धोकवडे ग्रामपंचायत हद्दीत काही धनदांडग्यांनी जागा घेतल्या आहेत. त्याठिकाणी लागणारे भराव तसेच खडी, मातीची वाहतूक अवजड वाहनांद्वारे केली जात आहे. म्हात्रे फाटा ते सासवणे रस्त्याला जोडणार्‍या लहान पुलावरून (मोरी) अवजड वाहनांची ये-जा असते. मात्र, हा पुल जीर्ण झाला असून त्यावर वाहतूक करणे धोकादायक असतानाही अवजड वाहनांची वर्दळ सुरूच ठेवण्यात आली आहे. हा पुल कधीही पडून गावांचा संपर्क तुटण्याचा धोका असल्याची भिती निर्माण झाली असल्यामुळे धनदांडग्यांच्या जागेपर्यंत माती, दगड आदी अवजड वाहनांची वाहतूक बंद होण्याची चिंता ठेकेदारांना निर्माण झाली होती. संबंधित ठेकेदारांनी जिल्हा परिषदेकडून कोणतीही परवानगी न घेता या जीर्ण झालेल्या पुलाची दुरुस्ती केली. दुरुस्ती करताना हा पुल जून्याच पिलरवर उभाण्यात आला आहे. यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाची परवानगी न घेता काम केले असताना, जिल्हा परिषद बांधकाम अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु, हेच काम सर्वसामान्यांनी केले असते, तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असता. मात्र, धनदांडग्यांना वेगळा न्याय आणि गोरगरीबांना वेगळा न्याय या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या विना परवाना बांधकामबाबत जिल्हा परिषद काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित पुलाच्या कामाबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.

राहूल देवांग, कार्यकारी अभियंता,
रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग
Exit mobile version