बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाची उत्साहात सांगता

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पुढील 2024 चे अधिवेशन बे एरियात रंगणार आहे. यंदाच्या अधिवेशनाची मराठमोळ्या ढोलताशांच्या गजरात यशस्वी सांगता झाली. अवघ्या अमेरिकेतून या अधिवेशनाला मराठी रसिकांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती.

न्यू जर्सी येथे रंगलेल्या या अधिवेशनाची सांगता पारंपारिक विज्ञान दिंडीने झाली. नादरंग या ढोलताशांच्या कार्यक्रमात शिकागो, डलास, कनेक्टिकट, न्यू इंग्लंड सिएटल, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी या शहरांमधून आलेल्या ढोलताशा पथकाच्या वादनाने अवघा आसमंत दुमदुमून गेला. यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळाची अध्यक्षा विद्या जोशी आणि प्रमुख संयोजक प्रशांत कोल्हटकर, सह संयोजक अमर उर्हेकर यांनी हे अधिवेशन यशस्वी करणार्‍या सगळ्यांचेच आभार मानले.

अधिवेशनातील नृत्यरंग आणि नाट्यरंग स्पर्धेस स्थानिक कलाकारांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला. शंकर महादेवन या सोहळ्याचे वैशिष्ठ ठरले. तसेच स्वास्थ्य, मानसिक आरोग्य असे महत्त्वपूर्ण विषय अधिवेशनात समाविष्ठ होते. लहान मुलांसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रम, समुद्र पर्यटन आणि दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ नागरीकांसाठी उत्तररंग अन् विवाहइच्छुकांठी रेशिमगाठी हे कार्यक्रम तर होतेच. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या पदार्थांचा आस्वाद घेत सगळेच तृप्त होत आपापल्या राज्यात मराठी संस्कृतीचा ध्वज हातात घेत परतले. सातासमुद्रापार मराठी भाषा जपणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेतील मुलांचं तथास्तू कार्यक्रम अत्यंत अप्रतिम होता.

Exit mobile version